अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नकली सौंदर्यप्रसाधनांची विक्री रोखण्यासाठी कोतवाली पोलिसांनी शनिवारी (23 ऑगस्ट) धडक कारवाई केली. या कारवाईत 58 हजार 571 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा व्यापार्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी चेतन मोतीराम गणात्रा (रा. निगडी, पुणे) हे लिंकबस्टर ट्रेड मार्क अँड अँटी पायरसी कंपनीत इन्व्हेस्टीगेशन ऑफिसर म्हणून कार्यरत असून नित्या ट्रेडिंग कंपनीच्या कॉपीराइट हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना नेमण्यात आले आहे. त्यांनी कोतवाली पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.
गणात्रा व सहकारी सत्तार मुनाफ शेख यांनी कोतवाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती दिली. त्यानंतर उपनिरीक्षक गणेश देशमुख व पोलीस पथकासह तीन दुकानांवर छापा मारण्यात आला. पंचांच्या उपस्थितीत छापे टाकून मालाची तपासणी करण्यात आली. जय बाबा कॉस्मेटिक्सचे (मार्केट यार्ड) मालक केशव किशनचंद मोतीयानी (68, रा. सोनानगर). येथे 312 पाकिटे नकली मेहंदी, तसेच साबण व गोरी क्रीम मिळाले. लक्ष्मी कॉस्मेटिक्सचे (मोची गल्ली) मालक प्रकाश वासुदेव सचदेव (50, रा. सावेडी) येथे 11 पाकिटे नकली मेहंदी व 78 पाकिटे गोरी क्रीम आढळले. तसेच कॉस्मेटिक्स अँड लेडीज शॉपीचे (मोची गल्ली) मालक विशाल पुरण साखला (44, रा. पारशाखुट चौक) येथे 12 पाकिटे नकली मेहंदी मिळाली. संपूर्ण कारवाईदरम्यान एकूण 58 हजार 571 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पंचनाम्यानुसार सॅम्पल ठेवून उर्वरित माल सील करून पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे. तिघा दुकानमालकांवर कॉपीराईट अॅक्ट 1957 कलम 51 व 63 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईत पाकिस्तानात निर्मित उत्पादनेही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बाजारात उपलब्ध सौंदर्यप्रसाधनांचा खरेदीपूर्वी बारकाईने तपास करावा, तसेच संशयास्पद किंवा नकली मालाची माहिती पोलिसांना द्यावी.