अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकून ६ संशयित आरोपींविरूध्द ३ गुन्हे दाखल केले असून, सुमारे ३ लाख ७७ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या पथकांनी भिंगार कॅम्प, तोफखाना आणि कर्जत पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई केली.
तन्वीर मोहम्मद कुरेशी (३१), सलीम इबाल कुरेशी (१८, दोघेही रा. सदरबाजार, भिंगार) यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात, तन्वीर सत्तार कुरेशी (४०, रा. सुभेदार गल्ली, अहिल्यानगर), इम्रान हनीफ कुरेशी (४०, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात, इरफान उर्फ बबलु कुरेशी (रा. कुरेशी गल्ली, राशीन, ता. कर्जत) व सचिन आढाव (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरूध्द कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही संयुक्त कारवाई उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार बिरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, विशाल तनपुरे, गणेश धोत्रे, शाहीद शेख, अशोक लिपणे, बाळासाहेब गुंजाळ, हृदय घोडके, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनील मालणकर, भगवान थोरात आणि रोहित येमुल यांच्या प्रयत्नातून करण्यात आली.