अहमदनगर | नगर सह्याद्री
आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांच्यावर अखेर नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण सदरची घटना नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील पंचाळे या गावी घडलेली असल्याकारणाने पोलिसांनी पुढील तपासासाठी सिन्नर पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. दरम्यान या वक्तव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यात निषेध सभा घेण्यात आली तसेच संगमनेर, नगरमध्ये मुस्लिम समाजाकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शुक्रवार दि.१६ रोजी दुपारच्या नमाज पठणनंतर शहरातील मुस्लिम समाज बांधव कोठला येथे दुपारी तीन वाजता मोठ्या संख्येने जमले होते.
कोठला येथून मुस्लिम समाजाच्या मोर्चाला प्रारंभ झाला. यामध्ये युवकांनी हातात काळे झेंडे घेऊन व हातावर, डोक्यावर काळ्या पट्ट्या बांधून मोर्चात सहभाग नोंदवला. नगर-संभाजीनगर मार्गे मोर्चा डीएसपी चौकात आला असता, युवकांनी ठिय्या देत चक्का जाम आंदोलन केले. संतप्त युवकांनी जोरदार घोषणाबाजी करून सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. मोर्चामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
असंघटितपणामुळे हिंदू समाजाचे नुकसान; महंत रामगिरी महाराज
आमचा धर्म आणि संस्कृती शांततेच्या मार्गाने चालले आहेत. पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर अशावेळी आपल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी लागते. हिंदूंनी मजबूत आणि संघटित राहावे, हा आमचा उद्देश आहे. त्यांनी बांगलादेशात घडलेल्या अत्याचारांचा संदर्भ देत, हिंदूंनी अन्यायाला प्रतिकार करणे आवश्यक आहे, असे महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले. असंघटितपणामुळे हिंदू समाजाला नुकसान होत आहे, आणि गुन्हा दाखल झाल्यावर नोटीस येईल तेव्हा पुढे पाहू असे ते म्हणाले.
रामगिरी महाराजांच्या सुरक्षेत वाढ
रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने नवा वाद उभा राहिला आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांच्या विरोधात काल राज्यभरात मोर्चे निघाले होते. आता रामगिरी महाराजांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षेसाठी बंदूकधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर रामगिरी महाराजांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही ःमुख्यमंत्री
राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये रामगिरी महाराजांच्या वक्तव्याच्या विरोधात रोष बघायला मिळतोय. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना सप्ताहाच्या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर बघायला मिळाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात मोठं वक्तव्य केलं. या राज्यात संत परंपरा ही मोठी आहे. संतांच्या आशीर्वादामुळे राज्य कारभार सुरू आहे, म्हणून या महाराष्ट्रात संताच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची हिंमत कुणी करणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
विना परवाना रस्ता रोको; ४० जणांवर गुन्हा दाखल
सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेर्धात अहमदनगर शहरातील डीएसपी चौकात विना परवाना रस्ता रोको करण्यात आला होता. आता विना परवाना रस्ता रोको केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी तनवीर सलीम शेख यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील डी.एस.पी चौकात मधोमध बसुन रस्ता रोकोचे कोणताही नियोजन नसतांना येणार्या जाणार्या लोकांची अडवणुक केली. सदरचा महामार्ग विनापरवाना अर्धा तास अडवुन ठेवत अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.