Crime News : घरगुती वादातून पुतण्यासह एकाने चुलत्याच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास धामणे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ तालीम ता. मावळ जि. पुणे येथे घडली. शिरगाव परंदवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. महादेव भगवान गराडे (वय ७३, रा. धामणे ता.मावळ) असं हत्या झालेल्या चुलत्याचं नाव आहे.
मंगेश किसन गराडे (वय ३८, रा.धामणे मावळ) आणि एक अनोळखी असे या हत्येती आरोपी आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महादेव गराडे आणि आरोपी मंगेश गराडे यांच्यात सतत घरगुती वाद होते. त्यातून आरोपी मंगेश गराडे आणि त्याच्या एका साथीदाराने मयत महादेव गराडे यांच्या मानेवर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने महादेव गराडे यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलीस उपायुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, पोलीस उप निरीक्षक प्रकाश पारखे, नाईद शेख आणि पोलीस कर्मचारी उपस्थित राहून पुढील तपास करत आहेत. मावळ तालुक्यात चार दिवसात दुसरी हत्या झाली असून नात्यातील व्यक्तीची हत्या होत असल्याने दहशतीचं वातावरण निर्माण होत आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम करत आहेत.