450 कोटींना टोपी घालणाऱ्या सिस्पे, ट्रेडज्च्या संचालकांवर न्यायालयाचे आदेशाने गुन्हा / आरोपी शोधण्याचे धाडस दाखवणार का? सातशेपेक्षा जास्त पोलिसांंचे पैसे अडकले
सारिपाट / शिवाजी शिर्के
सह्याद्री मल्टीनीधीच्या माध्यमातून संदीप थोरात व त्याच्या टोळीने संपूर्ण जिल्ह्यात उच्छाद मांडला आणि त्यांच्याकडून हजारो गुंतवणूकदारांना गंडा घातला गेला. सह्याद्री मल्टिनिधी या कंपनीचा मुख्य सुत्रधार संदीप थोरात याच्या कारनाम्यांबाबत थेटपणे ‘नगर सह्याद्री’ने भूमिका घेतली. यानंतर थोरात व त्याच्या सहकाऱ्यांना बेड्या पडल्या. त्याचवेळी सिस्पेच्या घोटाळ्यांबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती. त्याची दखल घेत त्याचवेळी कारवाई झाली असती तर आज अनेकांचे पैसे वाचले असते आणि सिस्पेची टोळी गजाआड झालेली दिसली असती.
सिस्पेमधील गुंतवणुकीत फसवणूक झाल्याचे अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसांना समक्ष भेटून, अर्ज देऊन सांगितले. मात्र, त्याची दखल घेतली नाही. विनोद गाडीलकर यांनी थेट न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, गाडीलकर व त्यांच्यासोबतच्या 105 जणांच्या अर्जाची दखल वेळीच घेतली असती आणि त्यातून गुन्हा दाखल केला गेला असता तर त्यात पोलिसांची मर्दुमकी होती. न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आली. आता गुन्हा दाखल झालाच आहे तर, त्याअनुषंगाने जलद तपास व्हावा आणि अगस्त मिश्रापासून नवनाथ औताडेपर्यंत साऱ्यांनाच बेड्या पडणार का हा खरा प्रश्न आहे.
जास्तीच्या परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूकदारांची लुटमार करणारी सिस्पे ही पहिलीच कंपनी नाही. याआधी देखील अशा मल्टिनिधी कंपन्यांच्या माध्यमांतून अनेका कंपन्यांच्या टोळी मास्तरांनी हजारो कोटी रुपयांना चुना लावला आहे. यातील काही आजही पोलिस कोठडीत खितपत पडले आहेत तर काही पसार आहेत. जे पसार आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना वेळ नाही. यात अर्थपूर्ण संबंध देखील तपासण्याची गरज आहे. सिस्पेच्या फसवणुकीबाबत विनोद गाडीलकर यांनी थेट उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यास ठेवीदारांच्या वतीने तक्रार दिली होती. परंतु त्याची दखल न घेतल्याने यासंदर्भात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या आदेशाने वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 तसेच माहीती व तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66 प्रमाणे सुपा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
खा. निलेश लंके आणि डीवायएसपी भोसले यांच्या त्या कौतुकाने अनेकजण फसले!
सिस्पे आणि ट्रेंडज् या दोन्ही कंपन्या या पतसंस्था असल्याचे भासवून अगस्त मित्रापासून नवनाथ औताडे यांनी सुपा (पारनेर) येथे शाखा सुरू करण्याचा मोठा शानदार कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाला खासदार निलेश लंके यांनी हजेरी लावली. याशिवाय तत्कालीन पोलिस उपअधीक्षक संपतराव भोसले यांनी खाकीवदसह हजेरी लावली. या दोघांनीही मिश्रा आणि औताडे यांच्या टोळीचे तोंडभरुन कौतुक केले. लोकप्रतिनिधी आणि पोलिस अधिकारी तोंड भरुन कौतुक करताना पाहून अनेकांना या कंपनीवर विश्वास बसला आणि त्यातूनच अनेकजण गळाला लागले. अवघ्या काही महिन्यात साडेचारशे कोटी रुपयांना गंडवून ही टोळी पसार झाली असताना ज्यांनी कौतुक केले ते लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यावर ब्र शब्द बोलायला तयार नाहीत हे विशेष!
सुप्यात इन्फीनीटीचा बोर्ड लागला अन् लुटमार सुरू झाली!
सुपा येथील सिस्पे फिनोवेल्थ इंडिया व इन्फिनिटी इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांची ट्रेडझ ही मूळ कंपनी आहे. सिस्पे कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना दरमहा 5 ते 7 टक्के परतावा मिळवून देण्याचे अमिष दाखवले गेले. ट्रेडझ इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. ही ब्रोकर कंपनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगितले गेले. सुप्यात इन्फीनीटीचा बोर्ड लावून मल्टीस्टेट पतसंस्था असल्याचा फार्स केला गेला आणि त्याआडून गुंतवणूकदारांची लुटमार सुरू झाली.
अगस्त मिश्रा हाच खरा मास्टरमाईंड!
कंपनीचे सीईओ अगस्त मिश्रा हा या फर्मचा मुख्य ट्रेडर व फंड मॅनेजर आहे. गुंतवणूकदारांना दरमहा 10 ते 12 टक्के परतावा मिळवून देण्याची हमी तोच देत होता. गुंतवणूकदारांची गुंतवणूक कंपनीकडे सुरक्षित असून, गुंतवणूकदार जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा त्याच्या खात्यातून ही रक्कम काढून घेऊ शकते अशी हमी देखील तो द्यायचा. अगस्त मिश्रा याच्याकडेच बहुतांश रक्कम गेली आणि त्यानेच बाकीच्या संचालकांवर गंडवले असल्याची चर्चा आहे.
सावेडीत होणार होती पुढची शाखा!
सुपा (पारनेर) येथील भव्यदिव्य कार्यक्रमानंतर पुढची शाखा नगर शहरातील पाईपलाईन रोड येथे सुरू करण्याचे नियोजन अगस्त मिश्रा याने केले होते. सुपा येथील कार्यक्रमातच याबाबत खा. निलेश लंके यांना पाईपलाईन रोड शाखेच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यात आले होते आणि ते त्यांनी स्वीकारले देखील होते. सिस्पे फिनोवेल्थ इंडिया व इन्फिनिटी इन्व्हेस्टमेंट मल्टीस्टेट पतसंस्थेसाठी पाईपलाईन रोडवर जागा देखील भाडे कराराने निश्चित झाली होती. मात्र, त्याआधीच म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सिस्पेच्या गुंतवणुकदारांना अडचणी आल्या आणि नगरमधील गुंतवणुकदार बालंबाल वाचले.