नवी दिल्ली / नगर सहयाद्री : चंडीगड महापौरपदाचे निवडणूक देशभर गाजली होती. या मतपत्रिकेत छेडछाड करून भाजपच्या उमेदवाराला महापौर करण्यात आले होते. आता अनिल मसिह यांनी जाणूनबुजून मतपत्रिकांशी छेडछाड केली व त्या मतपत्रिका अवैध ठरविल्याचे सिद्ध झाले आहे. आता भाजप उमेदवाराचा विजय रद्दबातल ठरवित सर्वोच्च न्यायालयाने आप-काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला विजयी ठरविले.
निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी छेडछाड केलेल्या व अवैध ठरविलेल्या ८ मतपत्रिकांमध्ये कुलदीपकुमार यांना मते मिळाली होती, हे सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिका व निवडणूक प्रक्रियेच्या चित्रीकरणाच्या पडताळणीत स्पष्ट झाले. त्यामुळे मसिह यांच्यावर खटला दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
८ मते अवैध ठरविल्यानंतर भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषित केले होते. भाजप उमेदवार मनोज सोनकार यांना १६ तर आप-काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुलदीपकुमार यांना १२ मते मिळाली. आप-काँग्रेसचे संख्याबळ अधिक असतानाही, असा निकाल दिल्याने न्यायालयात दाद मागितली होती. ३० जानेवारी रोजी झालेल्या गैरप्रकारावरून सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महापौर निवडणुकीसंदर्भात दिलेला निकाल हा लोकशाहीचा, सत्याचा आणि चंडीगडच्या नागरिकांचा विजय असल्याची प्रतिक्रिया चंडीगडचे नवे महापौर कुलदीप कुमार यांनी दिली आहे.