अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
शुक्रवारी सकाळची वेळ. सकाळीच नागरिकांमध्ये आणि मनपाचे कर्मचारी असल्याचे म्हणत पे अँड पार्किंगची रक्कम वसुली करणाऱ्यांमध्ये चांगलाच वाद पेटला. गाड्या पार्क करायच्या असतील तर पैसे द्या. नाहीतर तुमच्या गाड्या इथून हलवा. इथे गाड्या लावायच्या नाहीत, असे मनपाचे असल्याचे सांगत काही महिला नागरिकांना म्हणू लागल्या. हा वाद काही वेळाने चांगलाच हमरी तुमरीवर आला. नागरिकांनी या वसुलीला जोरदार विरोध करत चांगलेच धारेवर धरले.
दरम्यान काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आयुक्त साहेब, पार्किंगच्या अशा वादांमधून एखाद्याचा खून पडण्याची आता तुम्ही वाट पाहत आहात काय, असा जाहीर सवाल केला आहे.शुक्रवारी सकाळी आनंदऋषीजी हॉस्पिटलला लागून असणाऱ्या रस्त्यालगतच्या बिल्डिंगमध्ये एका खाजगी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये जेईईची परीक्षा होती. त्यासाठी विद्याथ, पालक चार चाकी, दुचाकी वरून मोठ्या संख्येने आले होते.
मात्र आपली वाहने पार्क करत असताना अचानक काही महिला येऊन नागरिकांना म्हणाल्या की, आम्ही मनपाचे लोक आहोत. इथे वाहन पार्क करायचे असतील तर दुचाकीसाठी पाच रुपये, तर चार चाकी साठी दहा रुपयांच्या पावत्या फाडाव्या लागतील. यावरून चांगल्याच वादाला तोंड फुटलं. बराच वेळ हा वाद सुरू होता. यावेळी नागरिकांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरत जाब विचारला.