छत्रपती संभाजीनगर | नगर सहयाद्री:-
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका महिलेशी गैरवर्तन केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. रिक्षा चालकाने प्रवासी महिलेला अश्लील स्पर्श केला, तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि पोलिसांनाही धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
युसूफ मोहंमद अली अन्सारी (रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. पीडित महिला ही राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागात कार्यरत असून त्या दररोज जालना येथून छत्रपती संभाजीनगरला ये-जा करतात. सोमवारी कार्यालयाजवळून रेल्वे स्टेशनकडे जात असताना त्यांनी रिक्षाने प्रवास केला. नेहमीप्रमाणे १० रुपये भाडे दिल्यावर रिक्षा चालकाने तू भिकारी आहेस का? असे अपमानास्पद शब्द वापरत अधिक भाड्याची मागणी करत शिवीगाळ सुरू केली.
त्यानंतर “तू आता पश्चात्ताप करशील” असे म्हणत आरोपीने महिलेवर अचानक झडप घालत अश्लील हेतूने स्पर्श केला आणि मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर महिला आणि चालकामध्ये झटापट सुरू झाली. घटनास्थळी नागरिकांनी हस्तक्षेप करत महिलेला मदत केली. दरम्यान, वाहतूक पोलीस अंमलदार गिरी आणि राठोड घटनास्थळी पोहोचले असताना आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की केली आणि ई-चलान मशीन जमिनीवर फेकून दिले. पोलिस व नागरिकांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, महिलांच्या सुरक्षिततेविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीवर महिलेशी गैरवर्तन, सरकारी कर्मचाऱ्याला अडथळा आणणे, मोबाईल हिसकावणे यासह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.