एक भारत, आत्मनिर्भर भारतचा संदेश देत राष्ट्रीय एकता दौड पार पडली
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त एक भारत, आत्मनिर्भर भारत घडविण्याचा संकल्प करत राष्ट्रीय एकता दौड उत्साहात पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत (चध इहरीरीं), जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा पोलीस दल, जिल्हा परिषद कार्यालय व अहिल्यानगर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या दौडीचे आयोजन करण्यात आले होते.
या राष्ट्रीय एकता दौडीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी दरेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, सत्यजीत संतोष आदी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले, देशाच्या विकासाचा खरा पाया म्हणजे राष्ट्रीय एकता. युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सहभागी होऊन आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे. समाजातील सर्व घटक एकत्र आल्यास तीच खरी राष्ट्रीय एकता ठरते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून या दौडीची सुरुवात करण्यात आली. मार्केटयार्ड चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, वाडिया पार्क, टिळक रोड आणि नगर-पुणे मार्गाने मार्गक्रमण करून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे दौड समाप्त झाली. विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी, शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवक-युवती, खेळाडू, स्वयंसेवक तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या दौडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी एकात्मतेची शपथ घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम, एक भारत, मजबूत भारत अशा घोषणा दिल्या.
युवक-युवतींनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडविणारी पारंपरिक नृत्ये व देशभक्तीपर सादरीकरणे सादर केली. एकतेतच शक्ती आहे हा संदेश त्यांच्या सादरीकरणातून अधोरेखित झाला. सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले.



 
                                    
