सुनवणी वेळी पुराव्यासह युक्तिवाद
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मनपा निवडणूक करिता प्रारूप प्रभाग रचना जाहीर करून १५ सप्टेंबर पर्यंत हरकती, सुचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांनी सर्व प्रभागांमध्ये मिळून एकूण १४ हरकती घेतल्या होत्या. शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी यांच्यासमोर हरकतींची सुनावणी सुरू असताना मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद नद्या, नाले, रेल्वे पूल, रस्ते यांना न ओलांडण्याच्या सूचना असताना देखील सत्ताधार्यांना लाभ होईल अशाप्रकारे रचना केल्याचा जोरदार युक्तिवाद पुराव्यांसह हरकत मांडत ठाकरे सेनेने केला. यावेळी अधिकार्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्तेचा गैरवापर करून मनपा निवडणुक रडीचा डाव खेळत जिंकण्यासाठी वोट चोरी पेक्षाही भयानक षडयंत्र सत्ताधारी आणि अधिकारी यांनी संगनमत करून रचले असल्याचा गंभीर आरोप सुनावणी नंतर काळे यांनी केला आहे.
सन २०१८ च्या रचनेतील प्रभाग ७ मधील नागापूर गावठाण नव्या रचनेमध्ये प्रभाग १ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सुमारे २२०० ते २४०० मतदान यामध्ये वळवण्यात आले आहे. यावर काळेंनी जोरदार युक्तिवाद केला. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नद्या न ओलांडण्याच्या सूचना असताना देखील अशी कोणती अपरिहार्यता निर्माण झाली की नदी ओलांडून नागापूर गावठाण प्रभाग १ मध्ये समाविष्ट केले? त्यावर आयुक्तांनी आम्ही नगर मनमाड रस्ता हा निकष पकडला.
यावर संतप्त होत काळे यांनी जिल्हाधिकार्यांना प्रभाग १७ मध्ये रेल्वे रूळ, रेल्वे फ्लाय ओव्हर, नगर दौंड रोड ओलांडला गेला, प्रभाग १३ मध्ये उड्डाणपूल, तर प्रभाग ५ मध्ये नगर मनमाड रोड, पत्रकार चौक ते डीएसपी चौक रोड नगर छत्रपती संभाजी नगर रोड ओलांडले गेले हे निदर्शनास आणून दिले. शासनाच्या निकषां प्रमाणे एका प्रभागात २२,४३७ लोकसंख्ये पर्यंत समावेश करता येऊ शकत असताना देखील राजकीय दबावातून नागापूर गावठाण हलविण्यात आल्याचा आक्षेप घेतला. याच बरोबर काळे यांनी सन २०१८ च्या रचनेतील ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्या प्रभाग ७, ८, १०, १२, १३, १५, १६ यांची मोडतोड करण्यात आल्या बाबत देखील आक्षेप घेतला.
मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाज टार्गेट
सर्वच प्रभागांमध्ये मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजाला विशेष टारगेट केल्याचा आरोप यावेळी ठाकरे शिवसेनेने केला. निवडणूक आयोग पारदर्शक आणि मुक्त वातावरणात व्हायला हव्यात. मात्र निवडणूक आयोग, प्रशासन हे भारतीय संविधान धाब्यावर बसवून अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी ही सत्ताधार्यांच्या राजकीय लाभाची करून नागरिकांना मात्र वेठीस धरत असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेने केला आहे.