अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष (ग्रामीण) जयंत वाघ यांनी अखेर सोमवारी (4 ऑगस्ट) आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सादर केला आहे.
6 फेब्रुवारी 2024 रोजी वाघ यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली होती, परंतु काही व्यक्तिगत कारणांमुळे त्यांनी पदाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडता येत नसल्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात अनेक बदल झाले आहेत. जानेवारी 2023 पासूनच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसमध्ये झालेल्या घडामोडींमुळे अनेकांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती.
काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी आपला राजीनामा दिला होता, त्यानंतर जिल्हाध्यक्षपदी श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे यांची निवड झाली. त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे या जिल्हाध्यक्ष झाल्या. विधानसभा निवडणुकीच्या वेळी नागवडे दाम्पत्यांनी राजीनामा दिल्यानंतर थोरातांचे कट्टर समर्थक असलेले जयंत वाघ यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.
गेल्या दीड वर्षात वाघ यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून चांगले काम केल्याचे म्हटले जाते. राजीनामा दिल्यानंतर संघटनेला मजबुती देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, आता वाघ यांनीही राजीनामा दिल्याने जिल्ह्यासाठी एका नव्या जिल्हाध्यक्षाची निवड करावी लागणार आहे. जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे.