Maharashtra Politics : पुण्यातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी काँग्रेसचा हात सोडत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं. रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत काँग्रेसला मोठा धक्का दिला. रवींद्र धंगेकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर आता काँग्रेसला मराठवाड्यामध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचा बडा नेता शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहे.
शिंदे गट ‘मिशन टायगर’च्या माध्यमातून महाविकास आघाडीला एकापाठोपाठ एक धक्के देत आहे. महाविकास आघाडीच्या अनेक बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केले आहेत. शिंदे गटामध्ये इनकमिंग अजूनही सुरूच आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केला.
त्यांच्यानंतर आता हिंगोली विधानसभेत काँग्रेसकडून सलग ३ वेळा आमदार राहिलेले काँग्रेसचे नेते भाऊराव पाटील गोरेगावकर (Bhaurao Patil Goregaonkar) आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. लवकरच हिंगोलीमध्ये गोरेगावकर यांचा पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडणार असल्याची माहिती शिवसेनेसह गोरेगावकरांच्या समर्थकांनी दिली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.