मुबई / नगर सह्याद्री :
बिहार निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. ज्या जागा निवडून आल्या. त्यासाठी मोठी कसरत आणि संघर्ष करावा लागला. आता या पराभवावर सकाळी सकाळी दिल्लीत बैठक घेत काँग्रेसने मंथन केले आणि महाराष्ट्रात त्याचे धक्के जाणवायला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला पहिला मोठा झटका दिला आहे. हा बिहार निवडमुकीचा साईड इफेक्ट तर नाही ना अशी चर्चा रंगली आहे.
काँग्रेस मुंबईत एकटी लढणार
काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी जाहीर केले. मुंबईत महाविकास आघाडी अथवा इतर कोणासोबत जाणार नसल्याची घोषणा त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चेन्नीथला यांनी काँग्रेसची कार्यकर्त्यांची भूमिका आहे की वेगळं लढावं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यात स्थानिक नेत्यांची बाजू ऐकून घ्यावी लागेल, अशी भूमिका घेतली.
दोन ठाकरे एकत्र आल्याने घेतला निर्णय?
वर्षा गायकवाड यांच्यावर कोणही नाराज नाही. सर्वजण सोबत आहेत. निवडणुक आयोगाने बिहारची निवडणूक जिंकून दिली हे सर्वांना माहीत आहे, महाराष्ट्रात ही असंच झालं, असा आरोप त्यांनी केला. तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे असा निर्णय घेतला का या प्रश्नावर दोन ठाकरे एकत्र आल्याने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीपासूनच कार्यकर्त्यांची तशी इच्छा असल्याचे ते म्हणाले.
227 जागांवर लढणार
मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे रमेश चेन्नीथल्ला यांनी जाहीर केले. 227 जागांवर लढणार असल्याचे ते म्हणाले. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्ता सांगणार तेच करावं लागणार. काँग्रेसला मजबूत बनण्याचं आमचं काम आहे. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. तर पक्षात स्थानिक पातळीवर कुठलीही नाराजी नाही. सगळे एक दिलाने लढणार असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसची ही भूमिका मुंबई महापालिकापुरतीच असेल की राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीतही ते अशीच भूमिका घेतील, यावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असेल. काँग्रेस बाजूला झाल्यावर मनसे-उद्धवसेना यांची युती मुंबई महापालिकेसाठी रान उठवण्याची शक्यता आहे. बिहार निवडणुकीवरून मित्रपक्षच काँग्रेसवर हल्ला चढवताना दिसत आहेत.
रमेश चेन्निथला काय म्हणाले?
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. २२७ जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. आमच्या पक्षाची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांची हिच इच्छा आहे की आम्ही स्वबळावर निवडणूक लढवली पाहिजे. त्यामुळे आम्ही महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहोत”, असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं आहे.
स्वबळावर निवडणूक लढवण्याचं कारण काय?
रमेश चेन्निथला यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचं कारण काय आहे? यावर रमेश चेन्निथला यांनी म्हटलं की, “स्थानिक पातळीवरील निवडणुका आहेत, त्यामुळे आमचे कार्यकर्ते जे बोलत आहेत, त्यांची जी इच्छा आहे, तो निर्णय आम्ही घेतला आहे. काहीही अडचण येणार नाही, येणाऱ्या दिवसांत आम्हाला आमचा पक्ष आणखी मजबूत करायचा आहे”, असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं.
काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनीही स्वबळाची केली होती घोषणा
“आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसेबरोबर जाण्याचा आता तरी कोणताही विचार किंवा प्रस्ताव नाही, हे स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेची तिजोरी खाली झाली आहे. मुंबईत भ्रष्ट्राचाराचे प्रकरणे खूप आहेत. खिरापत वाटली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे आवश्यक प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला समोरं जाऊ”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.
मुंबईत काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. तसेच पक्षाच्या हायकमांडबरोबर चर्चा झाल्यानंतरच पक्षाच्या स्थानिक नेत्यांना त्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे आणि आमच्या लोकांनी देखील तेच ठरवलं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.



