जामखेड । नगर सहयाद्री:-
ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराची तक्रार केल्याचा राग मनात धरून तब्बल 9 ते 10 जणांच्या टोळीने तलवार, कोयता, रॉड व काठ्यांनी सरपंच पतीसह चार व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना जामखेड तालुक्यातील झिक्री शिवारात घडली. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी चारचाकी वाहनाचेही मोठे नुकसान केले.
याप्रकरणी मिलिंद श्रीधर जीवडे (रा. चौंडी, जि. अहिल्यानगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी योगेश बापुराव इथापे, घनश्याम सोनबा कसाब, ऋषीकेश शिवाजी साळुंके, मयुर घनश्याम कसाब, अतुल जनार्धन कसाब सर्व (रा. चौंडी, जि. अहिल्यानगर) तसेच आणखी काही अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ग्राम रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहाराबाबत ग्रामसभेत आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांसमोर झालेल्या तक्रारीमुळे आरोपी संतप्त झाले होते. काही दिवसांपूव योगेश इथापे यांनी फिर्यादीचे चुलते मुकुंद जीवडे यांना मारहाण केली होती. 25 नोव्हेंबर रोजी रात्री आरोपी चारचाकी गाड्या मधून घटनास्थळी आले. हातात तलवार, कोयते, रॉड, काठ्या घेऊन आरोपी खाली उतरले.
योगेश इथापे यांनी तलवारीने मिलिंद जीवडे यांच्यावर वार केले. घनश्याम कसाब यांनी कोयत्याने मुकुंद जीवडे यांना जखमी केले. ऋषीकेश साळुंके यांनी लोखंडी रॉडने सागर जीवडे यांना मारहाण केली. मयुर कसाब यांनी काठीने दत्तात्रय साळुंके यांना मारहाण केली. अतुल कसाब यांनी लोखंडी रॉडने मिलिंद व मुकुंद जीवडे यांच्यावर हल्ला केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तसेच हल्ल्यादरम्यान आरोपींनी नादी लागलात तर एकेकाचा मुडदा पाडू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. जखमींवर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.



