अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
मध्यवर्ती शहर व सावेडी उपनगर परिसराला जोडणारा व वाहतुकीचा प्रमुख रस्ता असलेल्या पत्रकार चौक ते नेप्ती नाका चौक रस्त्याचे काम ८० टक्के झाले आहे. रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे लालटाकी येथील वैष्णव मातेचे मंदीर नागरिकांच्या सहकार्यातून स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय व वारुळाचा मारुती परिसर येथील मंदिरेही स्थलांतरित केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात उर्वरित कामे पूर्ण होऊन संपूर्ण रस्ता नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सर्व रस्त्याचा कामाचा आढावा घेतला. शहरातील सर्वाधिक रहदारी पत्रकार चौक ते नेप्ती नाका चौक रस्ता लवकरात लवकर खुला करण्यासाठी नियोजन करून उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्या. या रस्त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी १६.२९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लालटाकी येथील श्री वैष्णव माता मंदिर नागरिक व मंदिराच्या विश्वस्तांच्या सहकार्याने स्थलांतरित केले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही.
सदरचा रस्ता २४ फूट रुंद आहे. काँक्रीटीकरण झाल्याने वाहनांचा वेगही वाढणार आहे. अशा स्थितीत रस्त्यात मंदिर तसेच राहिले तर एखादी दुर्घटना होऊन मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले असते. त्यामुळे नागरिक व विश्वस्तांशी चर्चा केली व त्यांच्या सहकार्यामुळे मंदिर स्थलांतरित केले. वारुळाचा मारुती कमान व नेप्ती नाका चौक येथे असलेले सुशोभीकरण रस्त्यास अडथळा ठरत असल्याने हटवण्यात आले आहे. आता वारुळाचा मारुती कमान येथील मुंजोबा मंदिर व जिल्हा रुग्णालय येथील महालक्ष्मी मंदिर तेथील नागरिकांच्या सहकार्याने स्थलांतरित करण्यात येणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
सुमारे १७०० मीटर लांबी व २४ मीटर रुंदी असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास टळणार आहे. या रस्त्याचे ८०% काम पूर्ण झालेले आहे. येत्या महिनाभरात संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, अप्पू चौकात खाजगीकरणाच्या माध्यमातून नव्याने चौक सुशोभीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.