अहमदनगर / नगर सह्याद्री
आयुक्त यशवंत डांगे यांनी पदभार स्विकारल्यानंतर भल्या सकाळीच कचरा संकलन यंत्रनेची पाहणी करून सफाई कामगार व स्वच्छता निरीक्षक यांच्या कामाचा आढावा घेतला. कायनेटिक चौकातील गार्बेज कलेक्शन सेंटर अन्यत्र हलविणार या बाबत सांगितले. तसेच शहर स्वच्छ रहावे यासाठी रात्रपाळी सुरू करण्याचे घंटागाड्या चालकांना आदेश देण्यात आले.
अहमदनगर महानगरपालिकेत उपायुक्त पदी कार्यरत असताना स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मनपाला मानांकन मिळवून देणा-या यशवंत डांगे यांनी नगर शहरातील कचरा संकलन यंत्रनेची पाहणी केली. साफसफाई करणारे कामगार, कचरा संकलन करणा-या घंटागाड्यांवरील चालक आणि स्वच्छता निरीक्षक यांचा त्यांनी कामाचा आढावा घेतला. सकाळच्या वेळेतच नगर शहर स्वच्छ, सुंदर दिसले पाहिजे याबाबत कामगारांना सुचना देण्यात आल्या. नगर शहराच्या स्वच्छतेबाबत आपण यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यान्वित करणार असून घंटागाड्यांचे वेळापत्रकात बदल करणार आहोत या बाबत सांगितले. कचरा संकलन सकाळ, दुपार, संध्याकाळ घंटागाडयांद्वारे होईलच सोबत रात्रपाळी करून शहरातील कचरा उचलण्यात येईल अशा सुचना घनकचरा व्यवस्थापन विभागास देण्यात आलेल्या आहेत असे त्यांनी सांगितले.
सक्कर चौकापासून त्यांनी पाहणीस सुरूवात केली. त्याआगोदर त्यांनी कायनेटिक चौकातल्या गार्बेज कलेक्शन सेंटरची पाहणी करून सीना नदी घाट सुशोभिकरणासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मोठा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे येथील गार्बेज कलेक्शन सेंटर दुसरीकडे हलविण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार हे सेंटर अन्य ठिकाणी लवकरच हलविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयापासून पुढे माळीवाडा वेस, माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलिखूंट, नेता सुभाष चोक, चितळे रोड, चौपाटी कारंजा दिल्लीगेट वेस या मार्गावरून त्यांनी अधिकारी / कर्मचारी यांचे सोबत पायी फिरून कामगारांना ठिकठिकाणी साफसफाई करण्याचे निर्देश दिले. रस्त्यावरील साफसफाई झाल्यानंतर दुकाने उघडतात त्यानंतर दुकानदार झाडलोट करून तो कचरा पुन्हा रस्त्यावर आणून टाकतात याबाबत संबंधितांना समज देवून वारंवार अशा गोष्टी निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करून दंड आकरणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माळीवाडा वेशी जवळील असलेली कचरा कुंडी बंद करून तो कचरा घंटागाडीद्वारे उचलण्याची कार्यवाही करण्यात आली. दोन वर्षापुर्वी जसे स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वी करून दाखविले त्याप्रमाणे या वर्षी देखिल या अभियानात नगर शहर कुठेच कमी पडणार नाही याचा आपण दृढनिश्चय केलेला असून या वर्षीही मानांकन मिळवून नगर शहराला भरीव असा निधी उपलब्ध करून देवू असे त्यांनी म्हटले आहे.