अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अधिकारी व प्रभाग अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली असून सुरू असलेल्या विकासकामांना गती देण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहेत.
मनपा प्रशासनाला गतिमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, याचबरोबर नगरकरांमध्ये महापालिकेबद्दल आपलेपणाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. दैनंदिन प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविले जातील. स्वच्छ, सुंदर व हरित नगर शहर बनविण्यासाठी काम केले जाईल असे मत अहमदनगर महापालिकेचे नूतन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केले. अहमदनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पदाची सूत्रे यशवंत डांगे यांनी स्वीकारली. त्यानंतर ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विजयकुमार मुंढे, सहायक आयुक्त सपना वसावा, आस्थापना विभागप्रमुख मेहेर लहारे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, जल अभियंता परिमल निकम, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, शहर अभियंता मनोज पारखे, प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान, अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ, अभियंता गणेश गाडळकर, प्रभाग अधिकारी अशोक साबळे आदी उपस्थित होते.
आयुक्तांचे फटाके फोडून जनतेकडून स्वागत
महानगरपालिकेचे नूतन आयुक्तम्हणून यशवंत डांगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर फटाके फोडून नगरकरांनी त्यांचे स्वागत केले. आयुक्त डांगे यांनी कोरोना महामारी काळात मनपात उपायुक्त पदावर असताना आरोग्य, स्वच्छता याकडे गांभीर्याने लक्ष देत चांगले काम केले. विकास कामाला चालना देत असताना स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अहमदनगर शहराला नामांकन प्राप्त करून दिले. कोविड काळात अन्नछत्र, कोविड सेंटर, मोफत लसीकरण केंद्र, कॅण्टोन्मेंट झोन, कोविडमुळे दुर्दैवी मृत्यू होणार्यांचा अंत्यविधी तात्काळ व्हावा यासाठी नालेगाव अमरधाम सोबतच सावेडी उपनगरात सोय उपलब्ध करून दिली होती. सर्व काम करत असताना नगरकरांशी त्यांचा असलेला संपर्क व सुसंवाद यामुळे नगरकरांशी ऋणानुबंध निर्माण झाले असून यशवंत डांगे यांनी अहमदनगर मनपात आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्याने फटाके वाजवत नगरकरांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.