झेंडीगेटमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त | मोहीम आणखी तीव्र करण्याची मागणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नगर शहरातील झेंडीगेटसह मुकुंदनगर आणि अन्य काही भागात मोठ्या प्रमाणात अवैध कत्तलखाने असल्याची माहिती समोर येताच महापालिका प्रशासन आक्रमक झाल्याचे आज स्पष्ट झाले. मनपा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक जागेत अतिक्रमण करत अनेक अवैध कत्तलखाने असल्याचे मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेल्या पाहणीत समोर आले होते. अवैधपणे सुरू असलेेल्या या कत्तलखान्यांवर आज मोठ्या पोलिस बंदोबस्तात जेसीबी चालविण्यात आले. दरम्यान, महापालिकेची ही कारवाई आणखी तीव्र करण्याची मागणी नगरकरांमधून होऊ लागली आहे.
कोठला स्टँड परिसरात दोन दिवसांपूर्वी गाय मारुन तिचे अवशेष रस्त्यावर टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्या घटनेचे मोठे पडसाद उमटले आणि त्यातून आ. संग्राम जगताप यांनी रास्ता रोको आंदोलन करत मनपा प्रशासनाला कारवाई करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिस प्रशासनाने सदरचे कृत्य करणार्या आरोपीला बेड्या देखील ठोकल्या. मात्र, अवैध कत्तलखान्यांचा मुद्दा त्यावेळी ऐरणीवर आला.
झेंडीगेट परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध कत्तलखाने असल्याचे पाहणीत समोर आल्यानंतर मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलेल्या आदेशानुसार आज गुरुवारी सकाळीच मनपाचे अतिक्रमण हटाव पथक आणि पोलिस झेंडीगेट भागात दाखल झाले. कत्तलखाने आणि त्यासाठी लावलेले पत्रे स्वत:हून काढून टाकावेत असे आवाहन केल्यानंतर काहींनी ती काढली. मात्र, काहींनी प्रतिसाद न दिल्याने जेसीबीच्या मदतीने ही अतिकमणे आणि कत्तलखाने हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मोहीम दुपारपर्यंत चालूच होती. कोणाच्याही विरोधाला न जुमानता मनपा प्रशासनाने ही मोहीम चालूच ठेवली.
मनपाच्या आजच्या कारवाईत अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे, क्षेत्रीत अधिकारी रिजवान शेख, प्रभाग अधिकारी श्याम गोडाळकर, क्षेत्रीय अधिकारी अर्जुन जाधव, तसेच कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. दराडे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि आरसीएफचे दंगल नियंत्रण पथक सहभागी झाले होते.