अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा गावोगावी सायकलवरून प्रचार करणार्या नवनाथ पावसे व सागर पावसे यांना कौठे मलकापूर परिसरामध्ये महायुतीच्या गुंड कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. जखमींना तातडीने साकूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांकरिता त्यांना संगमनेरला आणले आहे. आ.बाळासाहेब थोरात यांनी जखमींची भेट घेऊन उपचाराचा आढावा घेतला. मारहाण करणार्यांना तातडीने अटक करावी. अन्यथा आम्ही बंदोबस्त करू, असा इशारा त्यांनी दिला.
हिवरगाव पावसा येथील नवनाथ लहानू पावसे व सागर किसन पावसे दहा दिवसांपासून तालुक्यात सायकलवर आमदार बाळासाहेब थोरात यांचा प्रचार करत आहेत.रविवारी साकूर सभेसाठी त्यांनी दिवसभर अनेक गावांमधून सायकलवरून प्रचार केला. यावरून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध राग निर्माण झाला. कौठे मलकापूरवरून साकूर येथील सभेला येत असताना वाटेमध्ये महायुतीच्या विशेषतः शिंदे गटाच्या दहा-बारा गुंडांनी त्यांना अडवले व तुम्ही प्रचार करू नका अशी दमदाटी दिली.
यावर नवनाथ व सागर यांनी आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आम्ही प्रचार करणार असे सांगितल्यानंतर या गुंडांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. काठीने मारहाण केल्यानंतर त्यांच्या पाठीवर वळ उठले तर नवनाथचा हात मोडला. सागरला जबर मारहाण झाली. घटना समजताच शंकर खेमनर व इंद्रजित खेमनर यांनी घटनास्थळाला भेट देऊन या दोघांना साकूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
आमदार बाळासाहेब थोरात व डॉ. जयश्री थोरात यांनी या कार्यकर्त्यांची रुग्णालयात भेट घेतली. यावेळी आमदार थोरात म्हणाले, राहाता तालुक्यातील दहशत संगमनेर तालुक्यात चालणार नाही. येथे सुसंस्कृत वातावरण आहे. निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात होते. मात्र कार्यकर्त्यांना एकटे गाठून मारहाण करायची ही संस्कृती खपवून घेणार नाही. पोलिसांनी मारहाण करणार्यांना तातडीने अटक असे ते म्हणाले.