तुळजाभवानी दर्शनाच्या निमित्ताने आ. लंके यांनी न्यारीच घडवलं! राम शिंदे समर्थकांकडून आ. लंके यांचे जोरदार स्वागत
ऑन दी स्पॉट रिपोर्ट | शिवाजी शिर्के
पुण्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर दुसर्याच दिवशी तुळजापुरच्या तुळजभवानी देवीचं आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने देवी दर्शनासाठी निघालेल्या पारनेरच्या आ. निलेश लंके यांनी जामखेडमध्ये वेगळाच डाव टाकला. भास्कर मोरे याच्या विरोधात उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांच्या उपोषणास भेट देताना आ. लंके यांनी भाजपाचे आ. राम शिंदे व शरद पवार गटाचे आ. रोहीत पवार यांच्या कामाचे कौतुक करताना उपोषणार्थी विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम हे दोन्ही आमदार करत असून आपणही त्यात मागे असणार नसल्याचा निर्वाळा दिला. जामखेडमध्ये भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे आ. राम शिंदे यांच्या समर्थकांकडून आ. लंके यांचे केलेले स्वागत आता चर्चेचा विषय ठरला आहे.
शुक्रवारी हंग्यातून निघालेल्या आ. निलेश लंके व समर्थकांची देवी दर्शन यात्रा नगर- करमाळा रस्त्याने निघाली. मिरजगाव, माहीजळगाव, खडकत, आरणगाव मार्गे जामखेड शहरात ही यात्रा आली. यानंतर खर्डा मार्गे औरंगाबाद- सोलापूर रस्त्याने ती तुळजापुरात दाखल झाली. तत्पूर्वी आ. लंके यांचे नगर तालुक्यात विविध गावांमध्ये स्वागत करण्यात आले. हायवेवर विविध ठिकाणी लावण्यात आलेले फ्लेक्स आणि त्यावरील मजकुर चर्चेचा विषय ठरला होता.
नगरच्या चांदणी चौकात नगर शहर व तालुक्यातील समर्थकांनी फटाके फोडून आ. लंके यांचे स्वागत केले. विविध ठिकाणी तुतारींच्या निनादात स्वागत करण्यात आले. आ. लंके यांनी देखील कार्यकर्त्यांना दाद देताना तुतारी फुंकली. साकत, रुईछत्तीसी येथे डिजेच्या वाद्यवृंदाने त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच डोंगरगाव येथे फुलांची उधळण करण्यात आली. आ. लंके यांचे विविध ठिकाणी स्वागत करतानाच त्यांचे औक्षण करण्यासाठीही मोठी गर्दी झालेली पाहण्यास मिळाली.
जामखेड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती मिळाल्यानंतर आ. लंके यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. जामखेड- कर्जतमध्ये आ. राम शिंदे आणि आ. रोहीत पवार यांच्यातील संघर्ष सर्वश्रृूत आहे. मात्र, आ. राम शिंदे आणि आ. लंके यांच्यातील मैत्री देखील तितकीच सर्वश्रुत! त्यातूनच आ. राम शिंदे यांचे समर्थक आ. लंके यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये आवर्जुन उपस्थित राहिले. जोडीने आ. रोहीत पवार यांचे समर्थक होतेच!
वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका दोन्ही आमदारांनी म्हणजेच आ. राम शिंदे व आ. रोहीत पवार यांनी घेतल्याचा आवर्जुन उल्लेख करतानाच या विषयाचे के्रडीट दोन्ही आमदारांना देण्यात आ. लंके विसरले नाही. अर्थातच या दोघांच्यात विस्तवही जात नाही. मात्र, आ. लंके यांच्यासाठी राम शिंदे यांनी मैत्रीचा शब्द दिला असल्याची चर्चा आहे.
त्याचाच एक भाग म्हणून राम शिंदे यांनी पहिल्याच दिवशी आ. लंके हे पुण्यात राष्ट्रवादी भवनात दाखल होताच फोनद्वारे मदतीचा दिलेला शब्द आणि लढण्याचा दिलेला कानमंत्र आता चर्चेचा विषय ठरला आहे. विद्यार्थी आंदोलनात सहभागी होऊन त्या विद्यार्थ्यांचे उपोषण आ. लंके यांन लिंबू पाणी देऊन सोडवले. खरेतर हे उपोषण आ. शिंदे अथवा आ. पवार हे सोडू शकले असते. मात्र, पारनेरहून आलेल्या आ. लंके यांच्या हस्ते हे उपोषण सोडवून आ. शिंदे व आ. पवार या दोघांनीही आपल्या पुढच्या राजकारणाची दिशा स्पष्ट केल्याचे मानले जाते. खासकरुन आ. राम शिंदे यांच्या या भूमिकेने आ. लंके यांच्यासह त्यांचे समर्थक सुखावले नसतील तर नवलच!
जामखेडमधून रवाना झाल्यानंतर खर्ड्यात आ. लंके यांचे जोरदार स्वागत झाले आणि त्यानंतर ते उशिरा तुळजापुरात दाखल झाले. सकाळी आठच्या सुमारास हंग्यातून निघालेल्या आ. लंके यांना तुळजापुरात दाखल होण्यास रात्री खुप उशिर झाला. गावोगावी होणारे स्वागतच त्यास कारणीभूत ठरले. लोकसभेला लंके दांम्पत्यापैकी कोण हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, दोघांपैकी एकजण उमेदवार असणार हे नक्की! पक्षात प्रवेश केला नसल्याचे त्यांनी या प्रवासात आवर्जुन सांगितले. मात्र, तुतारी फुंकली नाही असं एकही गाव राहिलं नाही. याचाच अर्थ आता लंके यांचं लोकसभेचं ठरलं आहे. दोन- तीन दिवसात मुहूर्तावर सारे काही जाहीर होईलच! मात्र, त्याआधी आ. लंके यांनी अत्यंत हुशारीने तुळजापुर देवी दर्शन नावाखाली मित्रवर्य आ. राम शिंदे यांच्या मतदारसंघातून केलेली कुच आणि घेतलेले आशीर्वाद बरेच बोलके आणि सुचक मानले जात आहेत.