अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या भंडारदरा धरणाला २०२६ साली शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त धरणाचा शताब्दीमहोत्सव साजरा करतानाच याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पाण्याविषयी व धरणाविषयी सर्व काही माहिती देणारे वॉटर म्युझियम तयार करावे, असा प्रस्ताव आमदार सत्यजीत तांबे यांनी सरकारला दिला होता.
यासंदर्भात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक देखील झाली होती. बैठकीत पर्यटनाचा आराखडा करण्यासाठी आणि जलसंपदा विभागाने आपापसात करार करण्याचा निर्णय झाला होता. मात्र अद्याप करारावर स्वाक्षरी झाली नसल्याने आ. तांबेंनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी आराखडा तयार करावा तसेच याठिकाणी ‘वॉटर म्युझियम’ साकारावे, अशी मागणी तीन वर्षापासून करत आहे. या संग्रहालयासाठी जागेचीही आवश्यकता आहे. जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय अर्थातच भंडारदरा धरणाच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने जलसंपदा व पर्यटन विभागाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवण्याचा एक सामंजस्य करार झाला आहे.
नाशिकचा कुंभमेळा व भंडारदरा धरणाची शतकपूर्ती एकाच वेळी येत असल्याने जागतिक पर्यटन वाढीच्या दृष्टीने सदर कराराची तात्काळ बैठकीत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करून पर्यटन व जलसंपदा विभागाने आपापसात करार करून पुढील कार्यवाही करावी. यासंदर्भात संबंधितांना आपले स्तरावरून सुयोग्य कार्यवाही करण्याची आदेश द्यावेत, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली आहे.