अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
मी नियोजित कटाचा बळी ठरलो, असा आरोप करत राम शिंदेंनी थेट अजितदादांवर संशय व्यक्त केला. अजितदादांना त्यांच्या सभा मागूनही त्यांनी दिल्या नाहीत, पवारांच्या कौटुंबिक कलहादरम्यान जे अघोषित करार झाले, त्याची अंमलबजावणी होण्याचे प्रकार कर्जत जामखेडमध्ये झाले, असा दावा राम शिंदे यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप उमेदवार आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
प्रीतिसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी अजितदादांनी पुतण्याला कानपिचक्या देत ‘दर्शन’ घ्यायला लावलं. तेव्हा रोहित पवार दादांच्या पाया पडले. यावर बोलताना राम शिंदे म्हणाले, की मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं, असं अजित पवार रोहित पवार यांना म्हणाले, याचा अर्थ हा नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला. दुसरं म्हणजे आमदार रोहित पवार स्वतःला राज्याचे भावी मंत्री आणि मु्ख्यमंत्री समजतात, त्यांनी या विधानसभा निवडणुकीत स्वतःचा आणि कुटुंबीयांचा मतदानाचा हक्क बजावला नाही, याचाही प्रत्यय आला. एकूणच या सगळ्या राजकीय सारीपाटात जे झालं, त्याचा मी बळी ठरलो असा आरोप राम शिंदे यांनी केला.
मी आधीच सांगितलं आहे, की जाहीररित्या प्रसारमाध्यमातून याविषयी बोलण्याची माझी मानसिकता नव्हती, परंतु दादाच जर यासंदर्भात बोलले असतील, तर मलाही समाजमाध्यमांतून बोलण्याशिवाय पर्याय नाही. पक्षाकडे आणि वरिष्ठांकडे मी निवडणुकीच्या कालखंडातच बोललो आहे, असं राम शिंदेंनी सांगितलं.
त्यांच्या कौटुंबिक कलहाच्या दरम्यान जे अघोषित करार झाले, त्याची अंमलबजावणी होण्याचे प्रकार कर्जत जामखेडमध्ये झाले. त्यांच्या पक्षाचा जो अजेंडा होता, शेवटी महायुतीचा धर्म मोठ्या नेत्यांनी पाळणं अपेक्षित आहे. माझ्यासारखा छोट्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढलो. शरद पवार 1967 मध्ये जेव्हा विधानसभेत पोहोचले, तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, अशा परिस्थितीत मी लढत दिली, माझ्या कार्यकर्त्यांनी झुंज दिली. असं राम शिंदे म्हणाले.
राज्यात पराभव झालेल्या उमेदवारांच्या यादीत चौथ्या क्रमाकांची, 1 लाख 26 हजार 433 मतं मला पडली, कमी मताच्या फरकाने पराभूत झालेल्या उमेदवारांच्या यादीत माझा सहावा क्रमांक लागतो. या कटाचा आणि अघोषित कारवाईचा मी बळी ठरल्याचं सिद्ध झालं आहे. यावर वरिष्ठांनी गांभीर्याने विचार विनिमय करावा ही माझी अपेक्षा असल्याचं राम शिंदे म्हणाले.
न्यायालयात दाद मागणार: प्रा. आ. राम शिंदे
फेरमतमोजणी संदर्भात मी अर्ज दिला होता, रिटर्निंग ऑफिसरने तो स्वीकारला नाही. आता जिथे शंका आहे, त्याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणार आहे. त्यावर काय निर्णय घेतात, यावरुन मी कारवाई ठरवेन, कारण कमी फरकाने पराजय झाला आहे. माझा पडताळणीचा अर्ज स्वीकारला, पण त्याआधीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उमेदवार विजयी घोषित करण्यात आला, ही मोठी चूक रिटर्निंग ऑफिसरने केली. मी याचिकाही दाखल करणार आहे, असं राम शिंदेंनी स्पष्ट केलं.