पारनेरमधील महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांचे मतदारांना पाच वर्षापूर्वीची चूक दुरुस्त करण्याचे आवाहन
पारनेर | नगर सह्याद्री
वैचारिक बैठक असणार्या तालुक्याची ओळख गेल्या पाच वर्षात का पुसली आणि कोणी पुसली या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांनाच करावे लागणार आहे. पाच वर्षापूर्वीची दुरूस्ती करण्याचे काम करण्याचा निर्धार आता सार्यांनी मिळून करण्याची गरज आहे. काही गोष्टींना वेळीच आवर घालावा लागेल आणि तसे झाले तर पुन्हा फक्त पश्चाताप आणि पश्चातपच हाती येणार असल्याची भिती महायुतीतील अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने निघोज, वडनेर परिसरात झालेल्या जाहीर सभांच्या माध्यमातून काशिनाथ दाते यांनी आपली भूमिका मांडली. खा. निलेश लंके यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर शरसंधान साधताना दाते यांनी गेल्या पाच वर्षात घडलेल्या काही घटनांचा संदर्भ मतदारांसमोर दिला. पाच वर्षापूर्वीची त्यांची भाषणे आठवा असे आवाहन करताना दाते पुढे म्हणाले की, प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आमदार व्हायला निघाला तर त्याला सार्यांनी मिळून विरोध केला. आता तोच मुलगा आमदार आणि खासदार झालाय! खासदारकी मिळाल्यानंतर सामान्य कुटुंबातील दुसर्या कोणालातरी ते उमेदवार म्हणून पुढे आणतील असे वाटत असताना प्रत्यक्षात त्यांनी कोणाला उमेदवारी मिळवून दिली हे समोर आहे.
गेल्या पाच वर्षात पारनेरमधील दहशत, प्रशासनाला हाताशी धरुन दिलेला त्रास आणि कायम खुनशी राजकारण यामुळे तालुक्याची वाटचाल नक्की कुठे चालली आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अण्णासाहेब हजारे यांचा हाच का तो पारनेर तालुका असे आता राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विचारला जात आहे. शांत, संयमी आणि वैचारिकदृष्ट्या सक्षम असणार्या या तालुक्याला नवी ओळख आणि नवी दिशा देण्यासाठी आता सर्वांनी पुढे येण्याची गरज असल्याचेही काशिनाथ दाते यांनी स्पष्ट केले.