पारनेर | नगर सह्याद्री:-
पारनेर तालुक्यातील सुरु असलेला वीजेचा सावळा गोंधळ, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, जळालेले रोहित्र बदलण्यास लागणारा वेळ याप्रश्नी आमदार काशीनाथ दाते यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
नगर येथील विज वितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता यांना तालुक्यातील विविध अडचणी संदर्भात आमदार काशीनाथ दाते व जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी तालुक्यातील विजेच्या वाढत्या गंभीर प्रश्नासंदर्भात लक्ष वेधले.
प्रामुख्याने भाळवणी येथील नविन सबस्टेशन ढवळपुरी सब स्टेशन वरुन राहुरी तालुक्यात वीज जोडल्याचे निर्देशनास आणून दिले. वडगाव सावताळ, वासुंदे, पळसपूर याभागातील शेतकऱ्यांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. त्याकडे लक्ष वेधले. तसेच केंद्र शासनाच्या आरडीडीएस या योजने अंतर्गत तालुक्यात अनेक गावामध्ये कामे मंजूर असुन रखडलेली आहे.
सदर कामे त्वरित सुरू करावी त्याचप्रमाणे पिण्याचा पाण्याचा रोहित्र जळाले ते मात्र त्वरित देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावर कार्यकारी अभियंता यांनी पारनेर तालुक्यात अधिकारी यांना त्वरित निर्देश दिले. यावेळी प्रशांत गायकवाड, अकोळनेर सरपंच प्रतिक शेळके, गोपीनाथ गहीले, काशिनाथ शिंदे, प्रशांत मोरे, प्रकाश मोरे व मान्यवर मंडळी उपस्थितीत होते.