मुंबई । नगर सहयाद्री:-
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशासह राज्यामध्ये सतत तापमानामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये सध्या किमान तापमानात वाढ झाली असून थंडी कमी झाली आहे. राज्यात सध्या सतत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस राज्यात अशीच परिस्थिती कायम राहणायची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज देखील ढगाळ वातावण कायम राहणार आहे. कमाल तापमानात २ ते ३ अंशानी वाढ होण्याची शक्यता असून थंडी कमी होत आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये दाट धुक्यांची चादर पसरली आहे.
राज्यातील ढगाळ वातावरण, पाऊस आणि धुक्यांमुळे राज्यातील बळीराजा चिंतेत आला आहे. या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता असल्याने बळीराजा चिंतेत आहे. अशामध्ये या पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची योग्य काळजी घ्यावी.
चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. उत्तर भारतात १५५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. उत्तरेकडील राज्यात दाट धुके आणि कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे. पश्चिम हिमालयीन भागात पश्चिमी चक्रावात तयार झाला असून पुढील चार दिवस हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबसह महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.