श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सतत ढगाळ हवामानामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे पिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. सध्या तालुक्यात कपाशी, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, मका यांसारख्या पिकांची उगवणी झालेली असून, शेतकरी खुरपणी व कोळपणीच्या कामात व्यस्त आहेत.
मात्र सतत ढगाळ वातावरणामुळे काही भागांतील निचऱ्याच्या जमिनीत पिकांची वाढ मंदावल्याचे निरीक्षण आहे. याशिवाय रोगराईचा धोका वाढत असल्याने शेतकरी कृषी सेवा केंद्रांमध्ये रोगप्रतिबंधक औषधांची खरेदी शेतकरी करत आहेत. अनेक शेतकरी कृषितज्ज्ञांचा सल्ला घेत असून, तननाशकांची मागणी वाढली आहे. कृषी विभागाने तत्काळ मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मे महिन्यात झालेल्या असामान्य पावसामुळे जलस्रोत भरले, त्यामुळे पाण्याची टंचाई टळली आहे. रोहिणी व मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पेरण्या वेळेत पूर्ण झाल्या. तरीही सध्याचे हवामान खरीप हंगामासाठी आव्हानात्मक ठरत आहे. शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी मिळून योग्य उपाययोजना केल्यास या समस्यांवर नियंत्रण मिळवता येईल, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.