अनेक गावांचा संपर्क तुटला, जनावरे वाहून गेली
अहमदनगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर शहरासह जिल्हा गेल्या तीन दिवसांपासून सर्वत्र जोरदार पावसाची बॅटिंग सुरु आहे. या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान पाथर्डी, पारनेर, कर्जत, श्रीगोंद्या व नगर तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृष पाऊस झाला. रात्री तीनच्या सुमारास पावसाने अचानक जोर धरला. विशेषतः तालुयाच्या पश्चिम भागात अनेक तास मुसळधार पाऊस कोसळत राहिला असून पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तीन दिवसापासून पाऊस सुरू आहे. नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. विशेषतः शेवगाव, पाथर्डी तालुयातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे करंजी, मढीसह अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांनी झाडांवर आसरा घेतला. जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सीना नदीला पूर
नगर शहरासह अहिल्यानगर तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. अहिल्यानगर तालुयातील जेऊर, ससेवाडी पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदीला महापूर आला होता. दरम्यान सीना नदीला पूर आल्याने कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ बंद झाली होती. जेऊर गावातील बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते. बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नागरिकांचा सुमारे दोन तास गावाशी संपर्क तुटला होता. परिसरातील सर्व शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या होत्या. काही विद्यार्थी शाळेत आल्यामुळे सीना नदीच्या पुरामुळे गावांमध्ये अडकले होते. संत एकनाथ विद्यालयाचे प्राचार्य शांताराम नवले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व पालकांना व्यवस्थित मार्गदर्शन केल्याने विद्यार्थ्यांना फायदा झाला. बाजारपेठ अतिक्रमणात असून वारंवार अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात येत आहे. मागील महिन्यात झालेल्या ग्रामसभेत देखील अतिक्रमण हटविण्याचा ठराव झाला होता. परंतु अतिक्रमणावर कारवाई झालेली नाही. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे चालू वर्षी प्रथमच पिंपळगाव माळवी तलावात नवीन पाण्याची आवक झाली आहे.
करंजीत पुराच्या पाण्यातून १६ लोकांना काढले बाहेर
दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला. पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. पाथर्डी शहरातही पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कसबा विभागातील खोलेश्वर मंदिर, तपनेश्वर मंदिर पाण्यात गेले. आमराई मंदिराला पाण्याचा वेढा बसला. पावसाच्या पाण्याने शेत जमीनी वाहून गेले आहेत. पीकही त्याबरोबर नष्ट झाली आहे. अनेक शेत जमिनीत पाणी साचून आहे. शेतकर्यांचे मोठे नुकसान या पावसाने झाले आहे. दरम्यान करंजीत पुराच्या पाण्यात काही नागरिक अडकले होते. त्यातील सोळा लोकांना रेस्क्यू ऑपरेशन करत सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
मंदिरांना पाण्याचा वेढा, पिके गेली वाहून
पाथर्डी शहरातही पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कसबा विभागातील खोलेश्वर मंदिर, तपनेश्वर मंदिर परिसर पाणी वाढले आहे. आमराई मंदिराला पाण्याचा वेढा बसला आहे. शहर व परिसरात अनेक तास धो-धो पाऊस कोसळत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अनेक शेत जमिनी वाहून गेल्याने पीकही त्याबरोबर नष्ट झाली आहे. अनेक शेत जमिनीत पाणी साचून आहे. शेतकर्यांचे मोठे नुकसान या पावसाने झाले आहे.
रविवारचा तालुकानिहाय पाऊस
शनिवारपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नगर १९.६, पारनेर ३५.५, श्रीगोंदा ७०.१, कर्जत ५०.३, जामखेड २०.९, पाथर्डी ५६.२, श्रीरामपूर १०.८ मिलीमिटर पाऊस झाला. तर इतर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी २२.३ मिलीमिटर पाऊस झाला.
अनेक महामार्गांवरील वाहतूक ठप्प
राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग, बारामती-छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग तसेच पाथर्डी-बीड राज्य महामार्गावरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. यामुळे बराच वेळ या महामार्गांवरील वाहतूक बंद झाली होती. तर आता काही ठिकाणची वाहतूक सकाळी हळूहळू सुरू झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक १६ व १७ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नद्यांच्या विसर्गात वाढ; पूरस्थितीचा धोका
पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ७,६२७ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून ३,१५५ क्युसेक, प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून १०३२ क्युसेक, ओझर बंधारा ६१८ क्युसेक, मुळा धरणातून १००० क्युसेक, घोड धरणातून ८००० क्युसेक, सीना धरणातून १५०१ क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून ७५० क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून ११० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार शालेय व्यवस्थापन समित्यांना
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात आदेश निर्गमित केले. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्यांना आहेत. जिल्ह्यातील १९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झालेली असून पाथर्डी व शेवगाव तालुयातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर १५ व १६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत आवश्यकता असल्यास शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय शालेय व्यवस्थापन समिती घेऊ शकेल. सर्व मुख्याध्यापकांनी समिती अध्यक्षांसह बैठक घेऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. तथापि या कालावधीत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासंबंधी कामकाज करणे बंधनकारक राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात पावसाचा मुक्काम वाढला!
मुसळधार पावसाची सर्वदूर हजेरी; अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी
मुंबई : मान्सूनचा परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालत आहे. मुंबई पु्ण्यासह सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. आजही पावसाचा मुक्काम आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि सातार्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अन्य भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. मुंबईसह काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. अहिल्यानगर शहरात शनिवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. रविवारीही दिवसभर पाऊस सुरूच होता. सोमवारी सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. ढगाळ हवामान कायम आहे. राज्यात अन्य ठिकाणीही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्याला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबईतील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझसह अन्य उपनगरात जोरदा पाऊस सुरू झाला आहे. पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात अन्य जिल्ह्यांतही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये आज पावसाची शयता व्यक्त केली आहे. कोकणात हवामान विभागाचा पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शयता आहे. यामुळे अतिमहत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडूच नका असे आवाहन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्रशासनाच्या नागरिकांना सूचना
नागरिकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर न घोंडता सतर्क राहावं; प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी पूर, व्यापार आणि रहदारी व्यवस्थापनासाठी सज्ज राहावं, ही विनंती संबंधित अधिकार्यांनी केली आहे. नागरिकांनी शयतो घराबाहेर न पडता, अलर्टची सतत माहिती घेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.