Politics News: पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये चेंबरमध्ये बंद दाराआड २० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर जयंत पाटील शरद पवार यांची साथ सोडणार का? या राजकीय चर्चेला सुरूवात झाली. अजित पवार यांना याबाबत स्पष्टीकरण देत विषय संपवला. प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थिती पाहून बातम्या लावल्या पाहिजेत, असे अजित पवार यांनी सांगितले. त्याशिवाय जयंत पाटील यांच्यासोबत चेंबरमध्ये काय चर्चा झाली? याबाबतही त्यांनी सांगितले.
जयंत पाटील आणि माझ्यामध्ये एआय वर चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. प्रसारमाध्यमांनी काय आणि कोणत्या बातम्या लावाव्यात, हा त्यांचा प्रश्न आहे. पण वस्तुस्थिती पाहून बातम्या द्यायला हव्यात. आमची व्हीएसआयची बैठक होती. त्यासाठी मी आणि जयंत पाटील एकत्र आलो होतो. आजच्या व्हीएसआयच्या बैठकीत एआयचा महत्वाचा विषय होता. एआयचा फायदा होतोय. एआयचा वापर करणे काळाची गरज आहे.
एआयचा वापर करुन ऊसाचे उत्पादन वाढले आहे. आम्ही त्याचा वापर फळबागा आणि इतर पिकांसाठी देखाल करणार आहोत, याबाबत आमच्यामध्ये चर्चा झाली, असे अजित पवार यांनी सांगितले. पुण्यातील मांजरी येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला अनेक दिग्गज उपस्थित होते. अजित पवार, शरद पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह अनेक असे साखर उद्योगातील नेतेही या बैठकीला उपस्थित होते.