अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मोबाईल चार्जिंगच्या कारणावरून विद्यार्थ्याला लाकडी दांडके, लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी (1 डिसेंबर) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसीतील सम्राट चौकातील एन. एम. कोटींग कंपनीसमोर घडली. आकाश बाळु त्रिंबके (वय 20 रा. नेप्ती, ता. नगर) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे.
या प्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणार्या तिघांविरूध्द सोमवारी (2 डिसेंबर) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेम आप्पा नर्हे, ओम आप्प नर्हे (दोघे रा. नर्हे मळा, बोल्हेगाव, अहिल्यानगर), आर्यन विजय धलपे (रा. चेतना कॉलनी, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी व संशयित आरोपी असे सर्व जण रविवारी रात्री एमआयडीसीतील एन. एम. कोटींग कंपनी समोर शेकोटी करून शेकत असताना प्रेम नर्हे फिर्यादीला म्हणाला माझा मोबाईल तुझ्याकडील पॉवर बॅकला चार्जिंगला लाव. तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाले, माझ्या मोबाईलची बॅटरी कमी असून तो मी चार्जिंगला लावला आहे तुझा मोबाईल मी आत्ता लावणार नाही, असे म्हणताच प्रेमसह तिघांना फिर्यादीचा राग आला.
त्यांनी लाकडी दांडके, लोखंडी पाईप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चव्हाण करत आहेत.