निघोज । नगर सहयाद्री-
कुकडी नदीच्या टेल भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी घोड व कुकडी कालवा सल्लागार समिती सदस्य प्रकाश वायसे व घोडगंगाचे तज्ञ संचालक तसेच राज्याचे ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे ज्येष्ठ समर्थक सोपानराव भाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.७) परिसरातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
कुकडी डावा कालव्याला १ मार्च ते ८ एप्रिल या दरम्यान ३९ दिवस पाणी सुरू असतानाही ते पाणी कुकडी नदीच्या टेल भागातील म्हसे बुद्रुक व म्हसे खुर्द च्या बंधाऱ्यात आले नाही. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. कुकडी नदीवरील वरील सर्व बंधाऱ्यांमध्ये पाणी असून टेलचे शेतकरी मात्र पाण्यापासून वंचित राहिले आहेत ,अशा संतप्त प्रक्रिया उमटत आहेत.
जर दोन दिवसात पाणी मिळाले नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी रखमा निचित, एकनाथ मुसळे , बाळासाहेब शिंदे , सुभाष शिंदे , बाळासाहेब पवार, हरिभाऊ मुसळे , प्रवीण मुसळे , बिभीषण वराळ , अनिल बढे , सुभाष कोल्हे आदी शेतकरी उपस्थित होते.
पारनेर व शिरुर तालुक्यातील म्हसे खुर्द व म्हसे बुद्रुक हे दोन गावांमध्ये कुकडी नदीचे क्षेत्र आहे कुकडी नदीला पाणी आल्याने या दोन्ही गावांचा फायदा होतो मात्र कडक उन्हाळा व पाण्याची टंचाई यामुळे हे दोन्ही गावांतील ग्रामस्थ व शेतकरी हतबल झाले आहेत. पाणी न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार हा निर्णय झाला असून यासाठी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पुढारी तसेच आंबेगाव – शिरुर लोकसभा मतदारसंघातील पुढारी काय भुमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. राज्याचे जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी कुकडीला पाणी सोडण्याची मागणी जनतेतून करण्यात आली होती यासाठी सुद्धा पाणी न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिला होता. जिल्हाधिकारी साहेब यांनी दखल घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने यात्रेसाठी पाणी सोडण्यात आले होते. आत्ता म्हसे येथील जनतेने निवडणूकीवर बहिष्कार घालणार असल्याचा ईशारा दिला असून पुढारी लक्ष घालतात की जिल्हाधिकारी लक्ष घालतात याकडे लक्ष वेधले आहे.