अहिल्यानगर। नगर सहयाद्री:-
शहरात सगळीकडे अतिक्रमण काढण्याची जोरदार मोहीम सुरु आहे, मात्र स्टेशन परिसरातील वहिवाटीच्या रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याबाबत वेळोवेळी पुरावे सादर करून देखील महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अनधिकृत बांधकामावर कधी कारवाई करणार? असा सवाल करत महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले.
यावेळी सचिन बनसोडे, कैलास कावळे, राहुल आंबटकर, मनोज कावळे, देविदास बनसोडे, प्रतीक बनसोडे, करण वाव्हळ, राजू आंबेडकर, अशोक आंबटकर, दुर्गा कावळे, दिपाली बनसोडे, अंजना बनसोडे, श्रद्धा कावळे, मीरा वाव्हळ आदी उपस्थित होते. सर्वे नंबर ४८ मधील वहिवाटीचा रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याबाबत रेल्वे स्टेशन रोड परिसरातील नागरिकांनी निवेदन दिले होते. निवेदनाद्वारे आशा अशोक गाडीलकर, अक्षय अशोक गाडीलकर, व इतर यांनी अनधिकृत बांधकाम करत बेकायदेशीर भाडेकरु देखील टाकले आहे. हे वहिवाटीच्या रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्यात यावे, अशी मागणी कला होती.
त्यावर प्रभाग समिती क्रमांक चार यांनी नोटीस देऊन वरील अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगून 30 दिवसाच्या आदी काढण्याचे सांगितले होते. परंतु त्या गोष्टीला तीन ते चार महिने उलटून गेले आहेत तरी देखील यांनी हे अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे स्टेशन परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन करत परिसरातील अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करावी, तसेच रस्त्याचा श्वास मोकळा करावा अशी मागणी केली आहे.