Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित भागातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. तापमानात चढ-उतार राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरात १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. अनुकूल वातावरणामुळे १३ मेपर्यंत मॉन्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
ओडिशातील संबलपूर येथे देशातील सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात काही भागांत वादळी पाऊस आणि गारपिटीचा अनुभव आला. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नगर, पुणे आणि विदर्भ, मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे.
आज मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.