अहमदनगर । नगर सहयाद्री:-
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका तरुण पोस्ट-ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीवर कर्तव्यावर असताना क्रूरपणे बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या भीषण घटनेने वैद्यकीय क्षेत्राला धक्का बसला आहे. याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे अत्यावश्यक व आपत्कालीन सेवा वगळता नियमित बाह्यरुग्ण तपासणी, शस्त्रक्रियेसह वैद्यकीय सेवा उद्या (शनिवारी) पहाटे सहा ते रविवारी (ता. १८) पहाटे सहा वाजेपर्यंतच्या २४ तासासाठी बंद ठेवण्यात येत आहे, अशी माहिती अहमदनगर इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेच्या वतीने देण्यात आली आहे.
सदर घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का दिला आहे. या प्रकरणातील तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांचा प्रतिसाद संशयास्पद होता, ज्यामुळे कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची जबाबदारी केंद्रीय तपास यंत्रणेला (CBI) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संप सुरु केला आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात आंदोलन आणि निषेध मोर्चे आयोजित केले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने देखील १७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ पर्यंत २४ तासांच्या वैद्यकीय सेवा बंदीचे आवाहन करण्यात आले आहे.