spot_img
अहमदनगरनगरकरांनो महत्वाची बातमी ! पिण्यासही पाणी मिळणार नाही..पहा काय घडलंय

नगरकरांनो महत्वाची बातमी ! पिण्यासही पाणी मिळणार नाही..पहा काय घडलंय

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : थकित वीज बिलाची रक्कम महापालिकेने जमा न केल्यामुळे महावितरणने शहराला पाणी पुरवठा करणार्‍या मुळा धरणावरील मुख्य उपसा केंद्राचा वीज पुरवठा बुधवारी (दि. ३१) सायंकाळी सात वाजता कट केला आहे. यामुळे पाणी उपसा पूर्णतः बंद असून, संपूर्ण शहरात पाणीबाणी आहे. नगरकरांना गुरूवारी कुठेच पाणी मिळाले नाही.

महापालिकेकडे चौकशी केली असता जवळपास सव्वा तीन कोटी रूपये थकित असून, हे बील डिसेंबर अखेरचे असल्याचे सांगण्यात आले. त्यापूर्वीचे सर्व पैसे जमा केले असून उर्वरित पैसे लवकरच जमा करू, असे महावितरणला सांगूनही वीज पुरवठा कट करण्याची कारवाई केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वीज पुरवठा पूर्ववत करावा, यासाठी बुधवारी रात्रीपासूनच महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे व पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम महावितरणच्या संपर्कात आहेत.

महापालिकेला पाणी पुरवठा, पथदिवे, कार्यालयातील वीज आदीपोटी काही कोटी वीज बिल येते. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. तरीही तडजोड करत आणि पैशांची जुळवाजुळव करत महापालिका वीज बिलाचे पैसे जमा करत असते. अत्यावश्यक खर्चाच्या यादीत वीज बिल वरच्या क्रमांकावर असते. यापूर्वी कोट्यवधी रूपयांची मोठी थकबाकी महापालिकेकडे असायची. चालू बिल देखील वेळेत जमा करणे महापालिकेला अशक्य होत असे. जकात बंद झाल्यापासून घायकुतीला आलेली महापालिकेची आर्थिक स्थिती अद्याप सुधरायला तयार नाही. याच परिस्थितीमुळे महापालिका फंडातील विकास कामे करण्यासाठी ठेकेदार धजावत नाहीत. वर्षानुवर्षे त्यांची देयके मिळत नाहीत. गेल्या काही महिन्यात महापालिकेने महावितरणकडे जवळपास २५ कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंतचे पाणी पुरवठा योजनेचे चालू वीज बिल निरंक केल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. कागदावर महावितरण महापालिकेकडे तिनशे कोटींपेक्षा अधिक थकबाकी असल्याचे सांगते. मात्र ही रक्कम वादात आहे. नगरपालिका असल्यापासूनचे हे थकित बिल असून, त्याची जबाबदारी महापालिका जीवन प्राधिकरणवर ढकलते, तर जीवन प्राधिकरण ही आपली जबाबदारी नसल्याचे सांगते. यावर सरकार दरबारी अनेकदा बैठकाही झाल्या आहेत. त्यावर तोडगा निघेपर्यंत महापालिकेने चालू बिल नियमित जमा करावे, असे ठरले आहे.
१९ जानेवारी अखेरपर्यंत पाणी योजनेच्या वीज बिलापोटी महापालिकेकडे तीन कोटी २० लाख ३७ हजार ६९७ एवढी थकित रक्कम असल्याचे सांगण्यात आले.

सध्या महापालिकेकडे एवढे पैसे नसल्याने ते टप्प्याटप्प्याने देण्यात येतील, असे आयुक्त डॉ. जावळे यांनी स्पष्ट केले. महावितरण अधिकार्‍यांनाही याबाबत आश्वस्त केले होते. मात्र कारवाई करण्याचा निर्णय घेत महावितरणने बुधवारी सायंकाळी सात वाजता मुळा धरणावरील महापालिकेच्या मुख्य उपसा केंद्रातील वीज पुरवठा कट केला. ही कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने अनेकदा विनंती करूनही महावितरण कारवाईवर ठाम राहिले. त्यामुळे बुधवारी सायंकाळी सातपासून शहरासाठी होणारा पाणी उपसा पूर्णतः ठप्प झाला आहे. वसंत टेकडी येथील जलकुंभात पाणी येऊ शकलेले नाही. पाणी वितरणच्या शहरातील टाक्या भरू शकल्या नाहीत. त्यामुळे गुरूवारी नगर शहरात कुठेच पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. एक प्रकारे शहरात पाणीबाणी आहे.

लोकांमध्ये क्षोभ निर्माण होऊ नये, यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि पाणी पुरवठा प्रमुख परिमल निकम बुधवारी कारवाई झाल्यापासून सातत्याने महावितरण अधिकार्‍यांच्या संपर्कात आहेत. अनेकदा या अधिकार्‍यांचे फोन घेतले जात नसल्याचेही सांगण्यात आले. तरीही महापालिकेचे प्रयत्न सुरूच असून यातून तोडगा निघेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला.

कर्मचारी सर्वेक्षणात, वसुली ठप्प
मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षणाचे आदेश आहेत. प्रथम हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश होते. त्याला आता २ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वेळेत सर्वेक्षण करणे आवश्यक असल्याने महापालिकेचे कर्मचारी यात गुंतले आहेत. यामध्ये वसुली विभागाचेही कर्मचारी आहेत. त्यांना सध्या सर्वेक्षणाचे काम प्राधान्याने करण्याचे आदेश असल्याने वसुलीचे काम पूर्णतः ठप्प आहे. त्यामुळे लगेच मनपाच्या तिजोरीत पैसे येणे शक्य नाही. एकीकडे तिजोरी रिकामी आणि दुसरीकडे महावितरणने वीज बिलासाठी पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा कट केला आहे.

पाणी कधी मिळेल?
दोन मिनिटांसाठी जरी वीज पुरवठा खंडित झाला तरी संपूर्ण उपसा थांबतो. तो पूर्ववत होऊन वसंत टेकडीपर्यंत पाणी येण्यास काही तासांचा अवधी जातो. आता तर बुधवारी रात्री सातपासून पाणी उपसा बंद आहे. तडजोडीनंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला तरी वसंत टेकडीपर्यंत पाणी येण्यास बराच अवधी लागेल. शिवाय जलवाहिन्या रिकाम्या असल्याने पाणी उपसा सुरू करताना टप्प्याटप्प्याने करावा लागतो. अन्यथा हवेच्या दाबाने जलवाहिन्या फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे नगरकरांना आता पाणी कधी मिळेल, हे निश्चित नाही.

राजकारणी निश्चिंत
वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने कारवाई केल्यानंतर नेहमीप्रमाणे एक दोन तासांनी वीजजोड केला जाईल, अशा भ्रमात अधिकारी आणि राजकारणी होते. यापूर्वी शहराचा पाणी पुरवठा खंडित होऊ नये म्हणून राजकारणी महावितरणला इशारे देत होते. आता प्रशासक असल्याने आमची जबाबदारी नाही, असा पवित्रा राजकारण्यांनी व माजी नगरसेवकांनी घेतलेला दिसून येत आहे. घडलेल्या प्रकाराबाबत फक्त सोशल मीडियावर माहिती देऊन माजी नगरसेवक आपली जबाबदारी संपल्याचे समाधान मानत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लोकसभेला ‘ब्रेक’ घेतलेले नितीन दिनकर विधानसभेला विजयाचा ‘गिअर’ टाकणार

काँग्रेसचा बालेकिल्लाला भाजप सुरुंग लावणार श्रीरामपूर | नगर सहयाद्री:- राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आता कोणत्याही...

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला

टाकळी ढोकेश्वर सरपंच विरोधात अविश्वास ठराव बारगळला बाळासाहेब खिलारी गटाने फटाके फोडत केला आनंद साजरा पारनेर/प्रतिनिधी...

आता ‘ही’ माझी शेवटची निवडणूक; माजी मंत्री शिवाजी कर्डिले स्पष्ट्च बोलले..

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने लवकर शेतकऱ्यांना दुधाच्या जोडधंद्यासाठी...