spot_img
अहमदनगरनगरकरांना फार्स नकोय, कृती हवीय!

नगरकरांना फार्स नकोय, कृती हवीय!

spot_img

आमदार संग्राम जगताप यांच्याच हातात नगरचा रिमोट कंट्रोल | आयुक्त डांगे यांना घ्यावी लागेल कणखर भूमिका
सारीपाट / शिवाजी शिर्के
नगर महानगरपालिकेत प्रशासक राज असले तरी त्या प्रशासकाचा रिमोट कोणाच्याा हातात आहे सांगण्याची गरज नाही. नागरी सुविधा देण्यात महापालिकेची यंत्रणा यशस्वी ठरली आहे काय या साध्या प्रश्नाच्या उत्तरात नगर शहरातील नागरिकांचा कौल घेतला तर त्याचा उत्तर नकाराथच येणार आहे. सोयीची कामे मार्गी लावली जात असताना जनतेच्या मनात ज्या कामांबद्दल संताप आहे त्या कामांच्या अनुषंगाने थेट जाब विचारणारी मंडळी पाहिली तर आयुक्तांची किती मोठी गोची होत असेल हेच समोर येते. आ. संग्राम जगताप यांच्या इशाऱ्यावर सारे काही चालू असतानाही तेच आ. जगताप आयुक्तांना जाब विचारताना अलिकडच्या काळात अनेकदा दिसले. रिमोट हातात असतानाही आयुक्तांना जाब विचारणाऱ्या जगताप यांच्याबाबत जनतेच्या मनात आदर निर्माण होत असला तरी आता जगताप यांनी आपली भूमिका बदलण्याची गरज आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यत सत्ता ताब्यात असताना त्या सत्तेच्या माध्यमातून नगरकरांना चांगल्या सेवा आणि सुविधा देण्याचे काम होण्याची गरज आहे. आयुक्त म्हणून काम करणाऱ्या यशवंत डांगे यांनी प्रशासनात बऱ्यापैकी पारदर्शकता आणली असली तरी टक्केवारीच्या मोहात अडकलेल्या काही विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना आवर घालण्याची गरज आहे.

पालकत्वाची भूमिका पार पाडताना दुजाभाव नको!
महापालिकेत प्रशासक राज सुरू झाल्यापासून तेथे लोकप्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक, महापौर असे पदाधिकारी नाहीत. हे पदाधिकारी असताना आणि आता नसतानाही महापालिकेच्या कारभाराचा रिमोट कंट्रोल आ. संग्राम जगताप यांच्याच हाती राहिला! राजकीय विरोधक दिसत असले तरी त्यांच्या भूमिका कधीच जगताप यांच्या विरोधात फारशा टोकाच्या दिसल्या नाहीत. आता तर नगर शहरात विरोधक दिसत असला तरी त्याचे उपद्रवमुल्य आ. जगताप यांनी दखल घ्यावे असेही राहिले नाही. नगरकरांनी जगताप यांना पुन्हा संधी दिली असताना व महापालिकेचा रिमोट त्यांच्याच हाती असताना आता त्यांनी खऱ्या अर्थाने पालकत्वाची भूमिका पार पाडण्याची गरज आहे. विविध कामांच्या माध्यमातून त्यांनी नगरकरांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. याशिवाय निवडणूक संपली असली तरी ते कायमच इलेक्शन मोडमध्ये असल्याचे गेल्या काही महिन्यातील कार्यक्रमांच्या माध्यमातून अधोरेखीत झाले आहे. कुस्ती स्पर्धा, नाट्य स्पर्धा, साहित्य संमेलन ही उदाहरणे त्यासाठी पुरेशी आहेत. नगर शहरात खरे तर आता अशाच कार्यक्रमांची गरज आहे. त्यातून नगरची वेगळी ओळख राज्यात नक्कीच निर्माण होणार आहे आणि त्याचे श्रेय नक्कीच आ. संग्राम जगताप यांना जाते आहे. आता त्यापुढे आणखी एक पाऊल टाकत जनतेच्या मनात नक्की काय चालू आहे आणि त्यांना नक्की काय हवंय याचा ठाव आ. जगताप यांनी घेण्याची गरज आहे.

नगररचना विभागातील अनागोंदी कोणाच्या आशीर्वादाने?
नगर रचना विभागातील अनागोंदी बाबत दोन दिवसांपूव आ. जगताप यांचे समर्थक समजल्या जाणाऱ्या अजिंक्य बोरकर यांनी आंदोलन केले. खरेतर या विभागात अलबेल काम कधी होते हाच मुळ प्रश्न आहे. आपल्या सोयीची कामे, फाईल मार्गी लागल्या की हा विभाग चांगला आणि तेथील कर्मचारीही चांगले. मात्र, तसे झाले नाही त्याच विभागाच्या विरोधात बोंबा मारल्या जातात. सामान्य नागरिकांच्या मनात हा विभागाबद्दल आणि तेथील कर्मचाऱ्यांबद्दल प्रचंड संताप व्यक्त होतो. या विभागात पोस्टींग मिळावी म्हणून टेंडर भरले जाते, अशी चर्चा आहे. अर्थात या टेंडरमधील रक्कम कोणाला जाते हेही सर्वश्रूत! त्यामुळेच तक्रारी होऊन देखील एखाद्या कर्मचारी अथवा अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई झाली असेे दिसले नाही. खरेतर या विभागातील अनागोंदीला जसा प्रशासकीय प्रमुखाचा आशीर्वाद आहे तसाच राजाश्रय देखील आहेच! हे मोडीत काढण्याचे धाडस आयुक्तांनी दाखवण्याची गरज आहे.

आयुक्तांनी खमकी भूमिका घेण्याची गरज!
नगर शहराची खडानखडा माहिती असणारे आयुक्त महापालिकेत आहेत. गल्लीबोळातील समस्यांची माहिती जशी त्यांना आहे तशीच त्यांना गल्लीबोळातील राजकारण देखील माहिती आहे. राजकीय दबावात आयुक्त काम करत असल्याचा आरोप अनेकदा झाला. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर आयुक्तांवर आरोप करणारेच आता त्यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे. दर्जेदार सुविधा देताना नगरकरांच्या गळ्यातील ताईत होण्याची संधी आयुक्तांना आहे. सध्या प्रशासक राज आहे. निवडणूक होतील आणि जनतेच्या मनातील नगरसेवक येतील त्यावेळी आयुक्तांची भूमिका बदललेली असेल. मात्र, सध्या प्रशासक म्हणून काम करताना त्यांना सर्वाधिकार आहेत. या अधिकारांचा वापर करत त्यांनी यंत्रणेला शिस्त लावण्याची गरज आहे.

पत्रा मार्केट तोडताना भेदभाव का?
गुलमोहोर रस्त्यावरील पारिजात चौकातील अतिक्रमीत पत्रा मार्केट तोडण्यात आयुक्तांनी खमकी भूमिका घेतली! नगरकरांनी त्यांच्या या धाडसाचे कौतुकच केले. मात्र, हे करत असताना त्याच चौकाच्या आसपास अनेक ठिकाणी पत्र्याची दुकाने आहेत. विशेषत: पाईपलाईन रस्त्यावर, कुष्ठधामसमोर, सावेडी उपनगरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पत्रा मार्केट आहेत. पत्र्याची दुकाने अन्‌‍ त्यांच्या रांगा उभा करताना महापालिकेचे सारे नियम फाट्यावर मारले गेलेत! त्यातून महापालिकेचे लोखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. अनधिकृत इमारत- बांधकामे यांच्यावर हातोडे पडत असताना या अनधिकृत पत्रा मार्केटला आयुक्तांकडून राजाश्रय का दिला जात आहे असा प्रश्न नगरकरांना पडला आहे. पारिजात चौकातील अतीक्रमीत पत्रा मार्केट तोडले जात असताना तोच न्याय अन्य भागातील अनधिकृत पत्रा मार्केटबाबत मिळाला पाहिजे.

शहरासह उपनगरांत पाण्याची बोंबाबोंब!
पिण्याचे पाणी वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी काही केल्या कमी व्हायला तयार नाहीत. पिण्याचे पाणी, रस्ते आणि वीज या प्राथमिक सुविधा आणि त्याही दर्जेदार मिळाव्यात इतकीच माफक अपेक्षा नगरकरांची आहे. रस्त्यांची कामे वेगाने मार्गी लागत असताना पिण्याच्या पाण्याबाबतची ओरड कमी व्हायला तयार नाही. आजी- माजी आणि काही ठिकाणी भावी म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांकडून या प्रश्नावर सध्या ओरड चालू असल्याचे दिसते. मुळात त्यांचे ते कामच आहे. मात्र, हा प्रश्न माग लागावा यासाठी कोणतीच ठोस यंत्रणा प्रभावीपणे काम करताना दिसत नाही.

कचरा संकलनाचे तीनतेरा
शहरातील कचऱ्याचे संकलन करण्यासाठी मोठा खर्च केला जातो. ओला- सुका कचऱ्यासह अन्य विविध प्रकारच्या कचऱ्याचे संकलन वेळेत होताना दिसत नाही. ज्या संस्थेने हा ठेका घेतलाय त्या संस्थेबाबत अनेक तक्रारी असतानाही कोणतीही कारवाई झाल्याचे अलिकडे समोर आलेले नाही. याबाबत लक्ष देण्याची गरज असताना प्रत्यक्षात ही संस्था महापालिकेची जावई झाली आहे की काय अशी शंका नगरकरांना येऊ लागली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सख्खा भाऊ पक्का वैरी!; लहान भावाला संपवल, ‘धक्कादायक’ वास्तव समोर..

Crime News: सातवड (ता. पाथर्डी) येथील संत्र्याच्या बागेत एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस...

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? तर तर ‘ही’ आहेत सर्वोत्तम ठिकाणे

मुंबई । नगर सहयाद्री:- कडक उन्हाळ्यात बरेच जण बाहेर फिरायला जायचा प्लॅन करत असतात....

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! १०० आणि २०० च्या नव्या नोटा लॉन्च करणार!, जुन्या नोटा…

Reserve Bank Of India: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे. १००...

नशीब चमकणार! ‘या’ राशीसाठी आनंदाची बातमी, वाचा राशिभविष्य..

मुंबई । नगर सह्याद्री मेष राशी भविष्य तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर...