अहिल्यानगर । नगर सहयाद्री
पिझ्झा आणि बर्गरचे वेड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच असते. मात्र, यामागे लपलेला आरोग्याचा गंभीर धोका समोर आला आहे. शहरातील चितळे रोडवरील एका नामांकित खाद्यपदार्थ दुकानात बनावट चीजचा वापर करून पिझ्झा, बर्गर तयार केल्याचे उघडकीस आले आहे.
खाद्य व औषध प्रशासनाने या दुकानावर छापा टाकून चीजचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले होते. नुकताच आलेल्या अहवालात या चीजमध्ये खाद्य तेलाचा वापर करून बनावट चीज तयार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकाराची माहिती विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी उचलून धरली होती. त्यांनी राज्यातील बनावट चीजप्रकरणी लक्ष वेधल्यानंतर अन्न प्रशासनाने तपास सुरू केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
बनावट चीज आरोग्यास अत्यंत घातक असून, त्यामुळे पचनसंस्था, यकृत व हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाजारातून खरेदी करताना चीजच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
अन्न प्रशासनाचे अधिकारी राजेश बडे यांच्याकडून पुढील चौकशी सुरू असून, संबंधित कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.