ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संवाद व वर्तवणूक चांगली ठेवावी / नागरिकांनीही सहकार्य करावे, महासभेच्या ठरावानुसारच शुल्क आकारणी सुरू : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर शहरात वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत ३६ रस्ते व जागांवर ‘पे अँड पार्क’ सुविधा व त्याचे दर, नो पार्किंगच्या दंडाचे दर हे तत्कालीन महासभेने सभेत ठराव करून मंजूर केले आहे. त्यानुसार सर्व प्रशासकीय प्रक्रिया, निविदा प्रक्रिया होऊन या धोरणाची अंमलबजावणी झालेली आहे. ठेकेदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून शुल्क वसुली सुरू करण्यात आली आहे. नो पार्किंग झोनमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर दंडात्मक व जप्तीची कारवाई होत आहे. कारवाईबाबत नागरिकांनी माहिती विचारल्यास कर्मचाऱ्यांनी योग्य ती माहिती द्यावी, नागरिकांशी वर्तवणूक चांगली ठेवावी, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्या आहेत.
शहरातील ३६ रस्त्यांपैकी बहुतांशी रस्त्यांवर पे अँड पार्कनुसार पार्किंग शुल्काची वसुली सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी खासगी संस्थेने कर्मचारीही नियुक्त केले आहेत. प्रमुख चौकांमध्ये व रस्त्यांवर नो पार्किंग करण्यात आले आहे, त्या ठिकाणीही अंमलबजावणी व कारवाई सुरू करण्यात आली आहे. दंडाचे दर हे तत्कालीन महासभेत मंजूर करण्यात आले आहेत. नो पार्किंग, नो हॉकर्स झोनमध्ये पार्कींग केल्यास (जीएसटी अतिरिक्त)
दुचाकी (टोविंग) – ७४२ रुपये, दुचाकी (क्लॅंपिंग) – ५०० रुपये, चारचाकी (टोविंग) – ९८४ रुपये,
चारचाकी (क्लॅंपिंग) – ७४२ रुपये असे दर निश्चित आहेत. सध्या प्रशासन केवळ अंमलबजावणीत करत आहे. नागरिकांनी नो पार्किंग झोनमध्ये वाहने लावू नयेत. रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करू नयेत, असे आवाहन करतानाच नियम न पाळण्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.
दरम्यान, शहरात भिस्तबाग चौक, एकविरा चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, दिल्लीगेट चौक, चौपाटी कारंजा चौक, नेताजी सुभाषचंद्र चौक, तेलीखुंट लोकसेवा चौक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय चौक, न्यू आर्ट्स कॉलेज परिसर, भिंगारवाला चौक, जुने कोर्ट ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंतचा रस्ता, झोपडी कॅन्टीन ते मिस्कीन मळा गंगा उद्यानपर्यंतचा रस्ता, पुणे बस स्थानक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (इम्पिरियल हॉटेल) चौक, विशाल गणपती मंदिर माळीवाडा चौक, मार्केटयार्ड चौक, तख्ती दरवाजा मशीद ते शनिचौक रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग नाही, मार्केट यार्ड चौक ते सक्कर चौक रस्ता नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे. तर
तसेच सुमारे १३ ठिकाणी पी १ व पी टू अशी सम व विषम पार्किंग सुविधा असणार आहे. संत दास गणुमहाराज पथ (कोर्ट गल्ली), पटवर्धन चौक ते शांतीबेन अपार्टमेंट (कोर्टाच्या इमारतीसमोर), घुमरेगल्लीतील तख्ती दरवाजा मस्जिद/संगम प्रिंटिंग प्रेस ते अमृत किराणा स्टोअर्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर, माळीवाडा वेस ते डॉ. आंबेडकर पुतळा, माळीवाडा वेस ते पंचपिर चावडी, पिंजारगल्ली, आडते बाजार, अनिल कुमार पोखर्णा (नारळवाले) पिंजारगल्ली कॉर्नर ते गदिया शॉप, शरद खतांचे दुकान आडते बाजार कॉर्नर ते कोंड्या मामा चौक, आयुर्वेद कॉलेज कॉर्नर ते माळीवाडा, रामचंद्र खुंट रस्ता ते ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय रस्त्यावर, श्री महाप्रभुजीमार्ग जुना कापडबाजार, संपूर्ण चितळे रस्ता (जुन्या सिव्हिलपासून) चौपाटी कारंजापर्यंत, दिल्ली गेट ते चौपाटी कारंजा, दाळ मंडई ते कापड बाजार रस्ता या भागात सम व विषम पार्किंग होणार आहे.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे म्हणाले की, पे अँड पार्कच्या माध्यमातून वाहतुकीची, पार्किंगची समस्या मार्गी लागेल, वाहतुकीला शिस्त येईल व महानगरपालिकेलाही उत्पन्न मिळेल. शहर वाहतूक शाखेला सम-विषम पार्किंग, नो पार्किंग झोनच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात येत आहेत. लवकरच त्याची अंमलबजावणी होईल व नो पार्किंगमध्ये वाहने आढळल्यास तत्कालीन महासभेने ठरल्यानुसार कारवाई केली जाईल, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.



