अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 27 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे 7,940 क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 9,465 क्युसेक, जायकवाडी धरणातून 37,728 क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणातून 820 क्यूसेक, निळवंडे धरणातून 1,521क्यूसेक,ओझर बंधारा 1,882 क्युसेक, मुळा धरणातून 2,000 क्युसेक, घोड धरणातून 5,000 क्युसेक, सीना धरणातून 3,070 क्युसेक, कुकडी नदीवरील येडगांव धरणातून 600 क्युसेक, हंगा नदीवरील विसापूर धरणातून 550 क्युसेक, खैरी धरण येथून 13,243इतका विसर्ग सुरू आहे.दरम्यान, जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.