नगर सहयाद्री वेब टीम
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टीव्ही आणि ऑनलाइन क्लासेसमुळे लहान मुलांमध्ये डोळ्यांचे आजार झपाट्याने वाढले आहेत. लहान वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत असल्याने पालकांना मोठी चिंता वाटत आहे. या समस्येवर नेत्ररोग तज्ज्ञ पूजा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले आहे.
डोळ्यांची तपासणी कधी करावी?
तज्ज्ञांच्या मते, बाळ जन्माला आल्यानंतर २१ दिवसांच्या आत डॉक्टरकडून प्राथमिक तपासणी करणे आवश्यक आहे. वेळेच्या आधी जन्मलेल्या बाळांसाठी डोळ्यांचे विशेष चेकअप करणे गरजेचे असते. मुलं ३ वर्षांची झाल्यावर पुन्हा एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे, कारण या वयात स्क्रीनचा वापर सुरू होतो.
लहान मुलांना चष्म्याचा प्लस नंबर कसा येतो?
काही मुलांना दूर किंवा जवळच्या गोष्टींवर फोकस करण्यात त्रास होतो. यामुळे त्यांना प्लस नंबर लागू शकतो. मुलांच्या डोळ्यांच्या तपासणीत ड्रॉप्स वापरून डोळ्यांचे आकार मोठे करून तपासणी केली जाते. तज्ज्ञांच्या मते, मुलांना २ वर्षे पूर्ण होईपर्यंत मोबाईल किंवा स्क्रीन टाळावी, आणि ३-४ वर्षांच्या वयात स्क्रीनचा वापर १ तासापर्यंत मर्यादित ठेवावा, फक्त अभ्यासासाठी.
मुलांचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स
1मोबाईल आणि स्क्रीन टाइम कमी करा – दिवसात जास्तीत जास्त १ ते १.५ तासांपर्यंत मर्यादित ठेवा.
2 डोळ्यांना विश्रांती द्या – प्रत्येक २० मिनिटांनी स्क्रीनपासून दूर बघायला सांगा. खिडकीबाहेरची हिरवळ किंवा निसर्ग दाखवा.
3 पौष्टिक आहार द्या – गाजर, पालक, बीटरूट, पपई, आंबा, बदाम आणि मासे यामध्ये व्हिटॅमिन A आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात असतात, जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत.
4 डोळ्यांचे व्यायाम – दररोज सकाळी डोळे गोल फिरवणे, वर-खाली बघणे यांसारखे व्यायाम करावेत.
5 पुरेशी झोप – मुलांना रोज किमान ८ ते १० तासांची झोप मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
6 सूर्यप्रकाशात खेळू द्या – नैसर्गिक प्रकाशात खेळल्याने डोळ्यांची कार्यक्षमता सुधारते आणि दुरच्या गोष्टी स्पष्ट दिसतात.
7 तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, योग्य आहार, झोप, स्क्रीन टाइमवर नियंत्रण आणि नियमित व्यायाम यांचा समावेश केल्यास मुलांचे डोळे निरोगी राहतात आणि चष्म्याची गरज लांबवता येते.



