चार इंस्टाग्रामधारकांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे (चाईल्ड पोर्नोग्राफी) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी चौघा इंस्टाग्रामधारक व्यक्तींविरोधात येथील सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार निळकंठ रंगनाथ कारखेले (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे.
आफझान शेख, वैभव कसबे, हर्ष भोगावत व जॅक जॉन अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघा इंस्टाग्रामधारकांची नावे आहेत. सदरचा प्रकार हा २५ ऑगस्ट २०२१ ते ३ जुलै २०२३ दरम्यान घडला आहे. मात्र, नॅशनल क्राईम रेकॉड ब्युरो (एनसीआरबी) यांनी दिलेल्या अहवालानंतर १ जानेवारी २०२५ रोजी येथील सायबर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. वरील चार इंस्टाग्राम धारक व्यक्तींनी लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे इलेट्रॉनिक स्वरूपात रेकाँडिंग केलेले व्हिडीओ तसेच फोटो हे इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिध्द केले.
सदरचे व्हिडीओ व फोटो इंस्टाग्राम कंपनीने हटवून तसा अहवाल नॅशनल क्राईम रेकॉड ब्युरो (एनसीआरबी) यांना सादर केला. त्यांनी संबंधीत व्यक्तीचे तांत्रिक विलेश्षण करून राज्य सायबर पोलिसांना याची माहिती दिली. संबंधीत व्यक्ती अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवाशी असल्याने सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी तसा अहवाल अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडे पाठविला. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करत आहेत.