पुणे। नगर सहयाद्री
मंगळवारी (दि. २०) विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले असून, ओबीसी आणि इतर समाजघटकाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे विशेष अधिवेशन आहे. उद्याच्या अधिवेशनातून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले शिवनेरीवरून जाहीर केले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. शिवजयंती सोहळ्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोगत व्यक्त करुन हे राज्य छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारे राज्य असल्याचे सांगत राज्य सरकार राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जे काही करता येईल, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत.
मागे आम्ही काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. पाकिस्तानकडे नजर रोखून असलेल्या पुतळ्याकडे बघून भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही. शासनाने दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे. तसेच सुधीर मुनगंटीवार लंडनहून वाघनखे महाराष्ट्रात आणणार आहेत. शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य आपल्याला निर्माण करायचे आहे. आदिवासींसाठीही राज्य शासनाने मोठ्या योजना हाती घेतल्या आहेत.