मुंबई / नगर सह्याद्री : सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आला आहे. ठिकठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात एल्गार सभा होत आहेत. परंतु याच दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळांवर हल्लाबोल करत, एका फर्नांडिस कुटुंबीयांना भुजबळांनी कसे फसवले हे माध्यमासमोर येऊन सांगितल्याने खळबळ उडाली.
सांताक्रुझ पश्चिम येथील छगन भुजबळांची इमारत ही फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर बांधली असून या कुटुंबाला एकही पैसा भुजबळांनी दिला नाही. गेल्या अनेक वर्षापासून फर्नांडिस कुटुंब त्यांच्या न्यायहक्कासाठी लढतं असून भुजबळांकडून कुठलीही दाद मिळत नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत. या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ४८ तासांत कुटुंबाला पैसे न मिळाल्यास भुजबळांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला होता. आता, या फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळाल्याचं दमानिया यांनी सांगितलं. त्यासाठी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत.
* नेमके काय आहे हे प्रकरण?
अंजली दमानिया यान सांगितल आहे की, गेल्या दीड वर्षापासून आम्ही फर्नांडिस कुटुंबासाठी लढत असून आम्ही एफआयआर केली आहे. ते नेमकं कुठल्या कष्टाचे खातायेत ते दाखवण्यासाठी आज मी भुजबळांचे घर मीडियाला दाखवणार होते. जे त्यांचे घर नसून हे फर्नांडिस कुटुंबाचे लुटलेले घर आहे. १९९४ मध्ये फर्नांडिस कुटुंब त्यांचा एक छोटा बंगला होता. तो बंगला पुनर्विकासासाठी रहेजा यांना दिला असं त्यांनी सांगितले.
या बंगल्याऐवजी बिल्डरकडून ५ फ्लॅट फर्नांडिस कुटुंबाला मिळणार होते. परंतु ते फ्लॅट या कुटुंबाला मिळाले नाहीत. तो जो बंगल्याचा प्लॉट होता तो समीर भुजबळांच्या परवेज कन्ट्रक्शनला परस्पर विकला गेला. ज्यादिवशी बंगला बुलडोझरनं पाडला त्यानंतर कुटुंब समीर भुजबळांना एकदा नव्हे हजारवेळा भेटले. तरीही आजतागायत या कुटुंबाला १ रुपयाही नुकसान भरपाई मिळाली नाही. सांताक्रुझ पश्चिमेला ती जी टोलेजंग इमारत आहे. जे ते कष्टाचे असल्याचे बोलतात, हा लुटलेला होता. फर्नांडिस कुटुंबाचा बंगला पाडून मोठी इमारत बांधलीय. त्या ९ व्या मजल्यावर स्विमिंग पूल बनवलंय. जिथे भुजबळ कुटुंब पोहते. हे या कुटुंबाचे पैसे आहेत. आजतागायत कुटुंबाला पैसे मिळाले नाहीत असा आरोप दमानिया यांनी केला.
त्याचसोबत मी सुप्रिया सुळेंना हे पाठवले, ३० सेकंदात त्यांचा फोन आला. माणूस पाठवून या कुटुंबाची पडताळणी केली. अक्षरश: या कुटुंबाची दयनीय परिस्थिती आहे. ७८ वर्षाची बाई ३ दिव्यांग मुलांना एकटं सांभाळते. ती उद्या गेली तर उद्या या मुलांना कुठे ठेवायचा हा त्यांचा प्रश्न आहे. दीड वर्ष झाले तरी समीर भुजबळ टोलवाटोलवी करत होते. जानेवारी महिन्यात साडे ८ कोटी देतो म्हणून सांगितले परंतु त्यानंतर भाजपात जाणार असल्याचे कळाल्यानंतर हे पैसे थांबवले. तुमच्याकडे इतका पैसा आहे पण या कुटुंबाला न्याय हवा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
छगन भुजबळांनी फेटाळले होते आरोप
अंजली दमानिया यांच्या आरोपावर छगन भुजबळ म्हणाले, आम्ही कुणाचेही घर लाटले नाही. याबाबत कोर्टात केस सुरू आहे. कोर्ट जो निकाल देईल तो निकाल आम्हाला मान्य आहे असं म्हणत भुजबळांनी आरोप फेटाळले होते. मात्र, आता त्यांनी पैसे दिले आहेत.