अहमदनगर। नगर सहयाद्री-
नगर महापालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त चार्ज हा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याकडे देण्यात आला आहे. आयुक्त डॉ. पंकज जावळे सध्या कार्यालयात उपस्थित नसल्याने प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हा कार्यभार सोपवण्यात आल्याचे नगर विकास विभागाने स्पष्ट केले आहे.
बांधकाम परवानगी देण्यासाठी एका बांधकाम व्यवसायिकाला आठ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी आयुक्त पंकज जावळे, तसेच स्वीय सहायक शेखर देशपांडे यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आयुक्त जावळे व देशपांडे दोघेही पसार आहेत.
एसीबीने या कारवाईचा अहवाल नगरविकास खात्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर नगरविकास खात्याने सोमवारी सायंकाळी आयुक्त जावळे यांचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त जोशी यांच्याकडे सोपवला आहे. दरम्यान आयुक्त जावळे हे सध्या कार्यालयात उपस्थित नसल्याने महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनातून हा कार्यभार सोपविण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप नगर विकास विभागाकडून जावळे यांच्यावर कारवाई झालेली नसल्याचे या पत्रातून स्पष्ट होत आहे.