अहिल्यानगर । नगर सहयाद्री
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ७) रोजी शहरातील काही भागांत वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्र येऊन सामूहिक नमाजपठण करतात. सदर इदगाह मैदान अहिल्यानगर पुणे महामार्गालगत आहे. तसेच ईदगाह मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आणि वाहनांची गर्दी होते. त्यामुळे पुणे-संभाजीनगर मार्गावरील डीएसपी चौक ते जीपीओ चौक भागातील वाहतूकीत बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिले आहेत.
त्यानुसार ७ जून रोजी सकाळी सात वाजल्यापासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत अहिल्यानगर पुणे मार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक वळविण्यात येणार आहे. संभाजीनगर रोड तसेच मनमाड रोड कडुन येणारी वाहतुक डीएसपी चौक न्यायनगर मार्गे- बेलेश्वर चौक- किल्ला चौक- जीपीओ चौक- चांदणी चौक मार्गे वळवण्यात आली आहे.
सोलापुर रोड, जामखेड रोड तसेच पुणे रोडकडुन येणारी वाहतूक जीपीओ चौक – बेलेश्वर चौक – न्यायनगर डीएसपी चौक- अशी वळवण्यात आली आहे. तर पुणे रोडकडुन उड्डाणपुलाचा वापर करुन येणारी वाहतुक चांदणी चौक येथील उड्डाणपुल मार्गाचा वापर करुन चांदणी चौक- जीपीओ चौक- बेलेश्वर चौक-न्यायनगर- डीएसपी चौक मार्गे वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे