Traffic Diversion News: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली निघणारा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार आहे. या पार्श्वभूमीवर 27 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात अवजड व मालवाहतूक वाहने पर्यायी मार्गे वळविणार आहे. तसा आदेश अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी काढला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली निघणारा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार आहे. हा मोर्चा अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथून मुंबईतील आझाद मैदानाकडे रवाना होणार असून, मोर्चाचा मुक्काम जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला परिसरात होणार आहे.
मोर्चाचा मार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून घोटण, शेवगाव, मिरी, माका, पांढरीपुल, अहिल्यानगर बायपास, नेप्ती चौक, आळेफाटा असा निश्चित करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग अपेक्षित असल्यामुळे सदर मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच मोर्चादरम्यान रस्त्यांवर वाहतूक वर्दळ वाढून अपघात अथवा कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अवजड व मालवाहतूक वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
ठरविण्यात आलेले पर्यायी मार्ग: 1) छत्रपती संभाजीनगरकडून नेवासा फाटा, पांढरीपुल, अहिल्यानगर, शेडी बायपासमार्गे येणारी वाहने नेवासा फाटा – श्रीरामपूर – राहुरी फॅक्टरी – विळद बायपास मार्गे इच्छित स्थळी वळविण्यात येतील. 2) अहिल्यानगर एमआयडीसी, शेडी बायपासमार्गे पांढरीपुलकडे जाणारी वाहने विळद बायपास – राहुरी फॅक्टरी- श्रीरामपूर – नेवासा फाटा मार्गे पुढे जातील. 3) शेवगावकडून मिरी-माका मार्गे पांढरीपुलाकडे येणारी वाहने शेवगाव – कुकाणा – नेवासा फाटा मार्गे किंवा शेवगाव – तिसगाव मार्गे इच्छित स्थळी जातील. 4) पांढरीपुलकडून मिरी-माका मार्गे शेवगावकडे जाणारी वाहने जेऊर – कोल्हार घाट – चिचोंडी मार्गे पुढे वळविण्यात येतील.
या आदेशातून शासकीय वाहने, मनोज जरांगे यांच्या मोर्चातील वाहने, रूग्णवाहिका, फायर ब्रिगेड तसेच अत्यावश्यक सेवेसाठी प्रशासनाने परवानगी दिलेली वाहने यांना सूट राहणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शक्यतो वरील मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.