अहिल्यानगर | नगर सह्याद्री
दुर्दैवाने, मी राजकारणातील अभिनयगिरीत अपयशी ठरलो, पण प्रामाणिकपणे विकासकामे केली आणि करत राहीन. मला नाकारले गेले तरीही, माझी सेवाव्रताची भूमिका कायम राहील, असा विश्वास माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, पारनेर विधानसभा मतदारसंघातील सत्तांतरामुळे तालुका सुरक्षित राहिला आहे. बीड जिल्ह्यात जे घडले, ते नगर जिल्ह्यात टळले. सत्तांतर समाजहितासाठी कसे गरजेचे होते आणि त्यासाठी नागरिकांनी दिलेला कौल कसा परिणामकारक ठरेल यावर भाष्य करत डॉ. विखे पाटील यांनी खा. नीलेश लंके यांना सणसणीत टोला लगावला.
अकोळनेर येथे डॉ. सुजय विखे पाटील, आ. शिवाजीराव कर्डिले आणि आ. काशिनाथ दाते यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला. अकोळनेर येथे प्रतीक दादा युवा मंचच्या वतीने आयोजित या भव्य सत्कार समारंभात डॉ. विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, विक्रम पाचपुते तसेच लाडक्या बहिणींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाई योजनेच्या अंतर्गत अकोळनेरला पाणीपुरवठा करण्याचा निर्धार देखील यावेळी बोलून दाखवला. ते म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा मंत्रीपद मिळाल्याचा जिरायत भागाला मोठा फायदा होणार आहे. निश्चितच परिसरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न माग लागेल व आमदार शिवाजीराव कर्डिले आणि काशिनाथ दाते यांच्या सहकार्याने पाणीपुरवठा लवकरच पूर्ण होईल आणि समस्त शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न निश्चितच माग लागेल, असे स्पष्ट केले.
तसेच 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साकळाई योजनेचा प्रश्न ही सोडविला जाईल व नागरिकांच्या मागणीला यश मिळेल असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच जो आपल्या गावासाठी पाणी देईल, त्यालाच पाठिंबा द्या, असे आवाहन देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी जनतेला केले. तसेच जो संकटाच्या काळात आपल्या बाजूने नाही, त्याला संघटनात स्थान नाही. असे देखील मत मांडून कठीण प्रसंगी साथ सोडणाऱ्यांना त्यांनी टोला लगावला. यासोबतच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विळदघाटात एमआयडीसी उभारून रोजगार निर्मितीचे आश्वासन देखील दिले.
मी ॲक्टींग करणारा नेता नव्हे
लग्नात बुंदी वाटणे किंवा इतर किरकोळ कामं करणे हे लोकप्रतिनिधींचे काम नाही. लोकप्रतिनिधींचे मूळ काम म्हणजे रोजगार निर्माण करणे, महिलांना सुरक्षित ठेवणे, पायाभूत सुविधा उभारणे आणि समाजाच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे हे आहे, असून मत मांडून मी ॲक्टिंग करणारा नेता नाही, मी माझ्या माझ्या कामातून बोलतो, असे स्पष्ट करून जनतेला योग्य अपेक्षा ठेवण्याचे आवाहन केले व विकासाच्या दिशेने काम करण्याचे आश्वासनही डॉ. सुजय विखेंनी जनतेला दिले. तसेच खासदार नीलेश लंके यांच्यावर शरसंधान साधले.