राजळे, ढाकणे यांच्या विरोधात मतदारसंघात सुप्त लाट |
शेवगाव | नगर सह्याद्री
जातीपातीच्या गणितात राजकीय पोळी भाजून घेणार्यांना आता शेवगाव आणि पाथर्डी या दोन्ही तालुक्यातील उच्चशिक्षीत तरुणांसह जनतेने हेरले असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. मोनिका राजळे आणि प्रताप ढाकणे या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी यावेळी देखील जातीचे कार्ड खेळण्यास प्रारंभ केल्याने मोठी नाराजी निर्माण झाली आहे. राजळे यांच्याकडून भ्रमनिरास झालेला असताना ढाकणे यांच्यासोबतचे कोंडाळे दोन्ही तालुक्यातून नाकारलेले निघाले आहे. त्यामुळे या दोघांच्याही विरोधात सुप्त लाट निर्माण झाली असून माजी आमदार अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांना तरुणांसह दोन्ही तालक्यातून मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे.
उमेदवारी जाहीर होत असताना व अर्जांची छाननी झाली असताना मतदानासाठीचा दिवस अद्याप बाकी आहे. मात्र, असे असताना पहिल्या टप्प्यात चंद्रशेखर घुले यांनी आपली स्वतंत्र यंत्रणा कार्यन्वीत केली आहे. करो या मरो असा नारा घुले पाटलांकडून दिला जात आहे. घुले बंधूंचा व्यापक संपर्क आणि जातीपातीच्या पलिकडे जाऊन सत्ता असताना आणि नसताना केलेली कामे, जनतेशी थेट जोडलेली नाळ या जमेच्या बाजू सोबत घेत चंद्रशेखर घुले यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे आशिर्वाद चंद्रशेखर घुले यांनी घेतल्याचे असल्याचे बोलले जात आहे.
प्रताप ढाकणे यांना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी आहे. ढाकणे यांच्याकडून नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. राजीव राजळे यांच्या अकाली निधनानंतर मोनिकाताई राजळे यांना संधी मिळाली. दुसर्यांदा आमदार म्हणून काम करता आले. मात्र, आता त्यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. पक्षांतर्गत विरोधक देखील राजळे यांच्या विरोधात गेले आहेत. त्यामुळे राजळे- ढाकणे या दोघांकडून दुरावलेले कार्यकर्ते थेट घुले पाटलांच्या संपर्कात आले आहेत.
राज्याच्या सत्ताकारणात अपक्षांचा भाव वधारणार!
राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात दुरंगी लढती होत असल्या तरी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळेल अशी शक्यात नाही. त्यामुळे या दोघांनाही अपक्षांचा टेकू घ्यावा लागणार आहे. चंद्रशेखर घुले पाटील यांनी हे हेरल्यानेच त्यांनी पवार गटाची उमेदवारी न घेण्याचा निर्णय घेतला. राज्यातील सत्ता समिकरणात अपक्षांचा भाव वधारणार आणि त्यात अपक्षांची भूमिका निर्णायक होणार असल्याने चंद्रशेखर घुले हे अपक्ष निवडून आले तर त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते. एकूणच, राज्याच्या सत्ताकारणात महत्वाची भूमिका बजावताना त्याचा फायदा मतदारसंघासाठी होणार असल्याची चर्चा आतापासूनच झडू लागली आहे.