मुंबई | नगर सहयाद्री :-
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आगामी ३ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टी जिल्ह्यांना धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने ट्रॉपिकल सायक्लोन अॅडव्हायजरी क्रमांक ०३ जारी करत महाराष्ट्रातील किनारपट्टी भागांसाठी चक्रीवादळ ‘शक्ती’चा उच्च ते मध्यम स्तरावरील इशारा दिला आहे. हा इशारा ३ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना धोका संभवत असल्याचे सांगण्यात आले आहे.
३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. झंझावाती वारे ६५ किमी प्रतितास वेगाने वाहू शकतात. चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यास या वाऱ्यांचा वेग आणखी वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.५ ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र अतिशय खवळलेला राहील. त्यामुळे मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, मराठवाड्याचे काही भाग आणि उत्तर कोकण येथे तीव्र ढगांची निर्मिती होऊन आर्द्रतेचा प्रवेश वाढल्याने पूरस्थिती उद्भवू शकते. सखल भागांमध्ये पूर येण्याची शक्यता प्रशासनाने नाकारलेली नाही. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनांना देण्यात आले आहेत. किनारपट्टी व सखल भागातील नागरिकांसाठी स्थलांतर योजना तयार ठेवण्यास सांगितले आहे. तसेच, जनतेसाठी सार्वजनिक सूचना जारी करत समुद्र प्रवास टाळावा आणि मुसळधार पावसात सुरक्षितता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.