खंडेरायावर हळदीची उधळण । गडावर भाविकांची गर्दी
पारनेर । नगर सह्याद्री
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाचा चंपाषष्टी उत्सव राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा प्राप्त आसणारे पिंपळगाव रोठा येथील कोरठण खंडोबा देवस्थान गडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हार चा जयघोष केला.
उत्सवनिमित्त पहाटे चार वाजता खंडोबारायाचे मंगलस्नान पार पडल्यानंतर चांदीची सिंहासन पेटी व चांदीच्या उत्सव मूर्तीचे सिंहासनावर अनावरण झाले. उत्सव मूर्तींना साज-श्रृंगार करून पुजा व महाआरती करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे नेते दिपक लंके व जया लंके, पोलीस उपायुक्त गणेश इंगळे, शांताराम भालेराव, इंदुमती भालेराव आणि अन्नदाते यांच्या हस्ते अभिषेक, पुजा व आरती करण्यात आली. गोरेगाव येथून आलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे स्वागतही करण्यात आले.
दुपारी अकरा वाजता शब्दसाधक अविनाश भारती व घाटनांदुरफर यांचे किर्तन पार पडले, तर दुपारी एक वाजता शाहीर विलास अटक व शाहीर नामदेव शिंदे यांनी खंडोबाची गाण्यांची स्पर्धा सादर केली. याचवेळी खंडोबारायाची शाही रथातून मंदीर प्रदिक्षणा मिरवणूक पार पडली. सकाळी अकरा वाजल्यापासून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी कोरठण खंडोबा देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे, माजी सरपंच अशोक घुले, खजिनदार कमलेश घुले, विश्वस्त चंद्रभान ठुबे, तुकाराम जगताप, भाऊसाहेब गाडगे, जालिंदर खोसे, सुवर्णा घाडगे, अजित महांडुळे, सुरेश फापाळे, दिलीप घुले व महादेव पुंडे उपस्थित होते.



