अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
सिनेस्टाईलने चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आरोपीने साथीदारांसह सहा गुन्हे केले असल्याची कबुली दिली. सचिन लक्ष्मण टाके ( वय 33, रा.शिरसगाव, ता.श्रीरामपूर) असे अटक केलेल्या सराईत आरोपींची नाव आहे. राहुरी येथे खरेदी करत असताना आशा नंदकुमार जंगम ( रा. राहुरी, जि, अहिल्यानगर ) यांचे गळयातील सोन्याचे मिनी गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी ओढून नेले होते. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पो. नि. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून चैन स्नॅचिंग गुन्ह्यांचा समांतर करणे बाबत आदेशित केले होते. त्यानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, फुरकान शेख, संदिप दरंदले, रणजीत जाधव, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गुंजाळ, अमोल कोतकर, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व महादेव भांड यांचे पथक नेमून चैन स्नॅचिंगचे गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींकडे तपास करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आवश्यक सुचना देत पथकास रवाना केले होते.
पथकाने चैन स्नॅचिंग घटना ठिकाणी भेट देवून, घटना ठिकाणचे व आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपासणी केली असता सदरचा गुन्हा सचिन लक्ष्मण टाके याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने अशोकनगर फाट्या जवळील रेल्वेच्या पुला जवळ 2 मोटार सायकलजवळ 3 पुरुष व 1 महिला संशयीतरित्या उभे असलेले दिसले. या चारही संशयितांना पथकाने ताब्यात घेतले.
आरोपींची ओळख पटवून गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत आरोपी श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडी मधील आसणेवस्ती येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने माळवाडी भागात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपींनी साथीदार राजेंद्र उर्फ पप्पु भिमा चव्हाण ( रा.खटकळी, बेलापूर, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर ) याचेसह अहिल्यानगर जिल्ह्यात सहा गुन्हे केले असल्याची कबुली दिली.